पुणे – सदाशिव पेठेतील इमारतीच्या बाथरुममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. ही महिला मृत होऊन दोन ते तीन दिवस झाले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने येथे कोणी रहात नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सासवडकर नावाच्या कुटूंबाच्या मालकीची 971 सदाशिव पेठ येते दत्तकृपा नावाची इमारत आहे. या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे सासवडकर कुटूंब दुसरीकडे रहावयास गेले आहे. या कुटूंबातील एक सदस्य सायंकाळी इमारतीची पहाणी करण्यासाठी आले होते.
यावेळी त्यांना इमारतीच्या बाथरुममधून वास येत होता. ते बाथरुमच्या दिशेने गेल्यावर त्यांना बाथरुममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तिकोणे व पोलीस अधिकारी दीपक जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. उत्तरोत्तर चाचणीत महिलेच्या मृत्यूचे कारण कळेल, तसेच तीची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती तिकोणे यांनी दिली.