पुरंदरमध्ये अतिवृष्टीत कोट्यवधींचे नुकसान

राज्यमंत्री शिवतारे यांनी घेतला तालुक्‍याचा आढावा

नीरा – पुरंदर तालुक्‍यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू असले तरी कोट्यवधींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरंदर तालुक्‍याचे आमदार आणि जलसंधारण राज्यमंत्री यांनी आज तालुक्‍यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी प्रचंड नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू असून या लोकांना तातडीने मदत करण्यास आदेश दिल्याचे मंत्री शिवतारे यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्‍यातील नाराणपूर, चिव्हेवाडी व पुरंदर किल्याच्या परिसरात बुधवारी (दि. 25) मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सासवड मधील नोंदणी नुसार 142 मिमी पाऊस झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष पुरंदर किल्ल्याचा परिसर, नारायणपूर, भिवडी या भागात याहीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. एका तासात झालेल्या जोरदार पावसामुळे कऱ्हा नदीला अभूतपूर्व असा पूर आला. नाझरेतून 25 हजार क्‍युसेकने विसर्ग सोडण्यात आल्याने नदीतून 80 ते 90 हजार क्‍युसेक पाणी वाहुन गेले. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले. घरांचे नुकसान झाले.

संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांची घरे पाण्यात वाहून गेली तर काही ठिकाणी शाळांच्या संरक्षक भिंती पडल्या. नदीकाठच्या शेतीला याचा फटका बसला आहे. शेकडो एकर जमीन वाहून गेली आहे. तर, नदीवर असलेले अनेक छोटे-छोटे सिमेंट बंधारे वाहून गेले. आसपासच्या गावातील संपर्क तुटला आहे. वीज वितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आज रोजी पुरंदर तालुक्‍यातील नदीकाठच्या अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. हे दुरुस्त करण्यासाठी वीज वितरणला सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. अचानक आलेल्या पुरामध्ये लोकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक लोकांची वाहने पुरात वाहून गेली तर नारायणपूर परिसरातील दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पुरंदरमध्ये 142 मिमी एवढा प्रचंड पाऊस झाला आहे त्यामध्ये शेतीचे मोठ नुकसान झाले आहे. भिलवडी सारख्या गावात 200 ते 300 एकर जमिनी पिकासह वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी लोकांना खाण्यापिण्याची सोय करून देण्यात येत आहे. वीज, रस्ता सुरळीत करण्याचे काम प्रशासनाकडुन सूरू आहे. नुकसानीची पाहणी करून योग्य त्या उपाय योजना करण्याचे काम सुरू आहे. लोकांनी खचून जावून नये. प्रशासन सर्व त्या उपाययोजना करीत आहे.
– विजय शिवतारे, राज्यमंत्री

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.