भोसरी मतदारसंघातील प्रश्‍नांबाबत दिलेला शब्द पूर्ण केला – आमदार लांडगे

चिखलीत भव्य मेळावा, महिला व युवा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – भोसरी मतदारसंघातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दीड कोटींची मदत करण्यात आली. मोशीतील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प मार्गी लावला. चिखलीत संतपीठासाठी जागा ताब्यात घेऊन त्याचे काम सुरु केले. देहू आळंदी, पुणे-आळंदी बीआरटी रस्ता सुरु केला. शहरातील सर्व एक हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामाचा शास्तीकर माफ करण्यात यश आल्याचे प्रतिपादन भोसरी आमदार महेश लांडगे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून चिखली ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील कार्यकर्त्यांचा इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात भव्य विजयी संकल्प मेळावा गुरुवारी (दि.27) घेण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष आनंदा यादव, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती स्विनल म्हेत्रे, नगरसेविका साधना मळेकर, सभापती गीताराम मोरे, माजी उपसरपंच यशवंत साने, तुकाराम मोरे, जितेंद्र यादव आदींसह हजारो महिला व चिखलीगावातील सर्वपक्षीय नेते, युवा कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी हवेलीचे माजी सभापती सुभाष मोरे, राष्ट्रवादीच्या सेवा दलाचे अध्यक्ष आनंदा यादव, पंडीत मोरे, रोहिदास मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

आमदार लांडगे म्हणाले, समाविष्ट गावातील नागरिकांचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी चिखलीत शंभर एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असून त्यातील पाणी केवळ चार गावांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे. आज गावातील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते एका व्यासपीठावर येतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने विजयी झाल्यासारखे वाटते. फक्‍त राजकारणाने लोक जवळ येत नाहीत तर प्रेमाने आणि आपुलकीने जवळ येतात. चिखलीगावाला वारकरी सांप्रादयाची मोठी परंपरा आहे. आम्ही भोसरीत आदरयुक्त राजकारण चालू केले आहे. नगरसेवक विकासाच्या ध्येयाने वेडे झाले आहेत. जबाबदारी पार पाडण्यासाठी ते अहोरात्र झटत आहे, असेही आमदार लांडगे म्हणाले.

यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले, आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महापौर पदावर काम करताना समाविष्ट गावांना मोठ्या प्रमाणात विकास कामे करुन न्याय दिला. यांनतर सभापती गीताराम मोरे, माजी उपसरपंच यशवंत साने, जितेंद्र यादव यांची भाषणे झाली. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महेश लांडगे यांनी विजयी करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.