fbpx

पुणे शहरात दुसऱ्या लाटेची सुरुवात?

शहरात करोनामुक्तीपेक्षा बाधितांची वाढती संख्या


सलग तिसऱ्या दिवशी 400 रुग्ण

पुणे – शहरात सलग तिसऱ्या दिवशी करोना बाधितांची संख्या वाढलेली आहे. दिवसभरात नव्याने 372 बाधित सापडले असून एक महिन्यानंतर पहिल्यांदाच करोनामुक्त व्यक्तींपेक्षा नवीन बाधितांची संख्या अधिक असल्याची नोंद झाली आहे. ही संख्या करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात असल्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आज, दिवसभरात 209 तर आतापर्यंत 1 लाख 57 हजार 164 बाधित करोनामुक्त झाले आहेत.

बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबर मृत्युच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत शहरात 10 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृत्युची संख्या 4 हजार 417 वर पोहचली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासून शहरात बाधित संख्येपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक होती. ऑक्‍टोबरचा संपूर्ण महिना आणि नोव्हेंबरमधील 16 तारखेपर्यंत हीच परिस्थिती होती. मात्र, मागील तीन दिवसांत ही परिस्थिती उलटली असून, बाधितांची संख्या करोनामुक्तीपेक्षा अधिक आहे.

दिवाळीमध्ये बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी, नाका-तोंडाला मास्क न लावता फिरणे, वेळोवेळी हात सॅनिटायझ न करणे आणि लक्षणे दिसूनही तात्काळ तपासणी करून उपचार न घेतल्यामुळे शहरातील बाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे अनुमान तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे.

सक्रिय बाधितांची संख्या आज 4 हजार 628 वर पोहचली असून, गेल्या 24 तासात जवळपास 300ने वाढ झाली आहे. त्यातील 378 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.