‘आमची काळजी तुम्ही करू नका’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपवर टीका

पुणे – महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही तर उत्तम समन्वय आहे. आमची काळजी तुम्ही करू नका, असा सल्ला देत… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व खात्यांना न्याय देत आहेत. या उलट युती सरकारमध्ये भाजपनेच शिवसेनेवर अन्याय केला असून, आजही त्याच नजरेतून भाजप पाहात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

महाविकास आघाडीतर्फे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेस भवनात शुक्रवारी (दि.20) संयुक्त बैठक पार पडली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, ऍड. वंदना चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शहरप्रमुख संजय मोरे, गटनेते पृथ्वीराज सुतार, महापालिका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आदी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली.

पाटील म्हणाले की, युती सरकारमध्ये भाजपने शिवसेनेला कमी महत्त्वाची खाती दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वांना समान खाती आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांचे सर्व खात्यांकडे लक्ष आहे. ते सर्व खात्यांना समान न्याय देत आहेत. त्यामुळे मतभेद असण्याचा प्रश्‍नच नाही. याउलट भाजपने खात्याबाबत द्वेष करून सेनेवर अन्याय केल्याचेही पाटील यांनी नमुद केले.

राज्यातील महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार निवडून येतील यात शंका नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. पदवीधर व शिक्षक मतदार संघात भाजपला पराभव दिसत आहे. तरी ते प्रयत्न करीत आहेत. आम्हाला चीतपट करण्याची भाषा ते करतात. मात्र, त्यांनी दररोज जोर बैठका माराव्यात म्हणजे परभवानंतर काहीतरी प्रयत्न केले, असे म्हणता येईल, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

भाजपमुळेच ऊर्जा महामंडळ संकटात…
ऊर्जा महामंडळाची वेगवेगळ्या ग्राहकांकडे 67 हजार कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे हे मंडळ संकटात सापडले आहे. ही थकबाकी भाजपच्या काळातली आहे. त्यामुळेच थकबाकीची कारणे काय आहेत. याचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हे सरकार जनतेसोबतच आहे. ऊर्जा महामंडळाला वाचविताना ग्राहकांना त्याचा फटका बसणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहे. ग्राहकांना कशी सवलत देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.