पुण्यातील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून नियमित होण्याची शक्यता

उच्च न्यायालय आणि बार कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे  – करोना संसर्गामुळे मार्चपासून बंद असलेले न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून (दि.11) नियमितपणे सुरू होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या वकिलांना लवकरच दिलासा मिळणार आहे. पक्षकारांनाही फायदा होणार आहे.

 

 

न्यायालय सध्या सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू असून, केवळ महत्त्वाच्या दाव्याची सुनावणी होत आहे. उच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी मुंबईत झाली. त्यात झालेल्या चर्चेत नियमित कामकाजाबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली आहे.

 

 

मुंबईत झालेल्या बैठकीस उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पदाधिकारी, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड. सुदीप पासबोला, माजी अध्यक्ष ऍड. सुभाष घाडगे, ऍड. विठ्ठल कोंडे-देशमुख, सदस्य ऍड. राजेंद्र उमाप, ऍड. उदय वारुंजीकर आणि मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ऑक्टोबरमध्ये लॉकडाउनचे अनेक नियम शिथिल करण्यात आल्यानंतर न्यायालये पूर्ववत सुरू होतील, अशी स्थिती निर्माण झाली होती.

 

 

मात्र, तेव्हापासून नियमित सुनावणीबाबत तारीख पे तारीख सुरू आहे. पण आता याबाबत पुढील दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय होऊन कामकाजाची कार्यपद्धती असलेली आचारसंहिता जाहीर होऊ शकते.

 

 

पुण्यातील न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.11) नियमित कामकाज सुरू होऊ शकते. तसेच, ज्या जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे कामकाज सुरू झालेले नाही, तेथील करोनाच्या स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तेथील अडचणी दुर करण्याबाबत चर्चाही बैठकीत झाली.

– ऍड. राजेंद्र उमाप, सदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.