पुणे – आंबट-गोड रसाळ मोसंबीचा आंबेबहार सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात औरंगाबाद जिल्ह्यातून दररोज 40 ते 50 टन एवढी मोसंबीची आवक होत आहे. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाला असून, आंबेबहारातील मोसंबीचा गोडवा येत्या काही दिवसांत वाढणार आहे.
मोसंबीचे तीन बहार असतात. आंबेबहार, मृगबहार आणि अडकन बहार हे तीन हंगाम असून दर्जेदार मोसंबीची आवक आंबेबहारात होते. पावसाळ्यात आंबेबहार सुरू होतो. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात औरंगाबाद, पैठण, पिंपरी राजा, अडुळ, बालानगर भागातून आवक होत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने आंबेबहारातील मोसंबीची प्रतवारीही चांगली आहे, असे मार्केट यार्डातील मोसंबी व्यापारी सोनू ढमढेरे यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंबेबहारातील मोसंबीची आवक वाढणार असून हंगामातील पहिल्या टप्यात मोसंबीची चव आंबट-गोड राहणार आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मोसंबीचा गोडवा आणखी वाढेल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंबेबहारातील मोसंबीची प्रतवारी चांगली राहणार आहे, तसेच भावही कमी राहतील, असे त्यांनी सांगितले.
सध्या किरकोळ बाजारात एक किलो मोसंबीची विक्री प्रतवारीनुसार 20 ते 50 रुपये भावाने केली जात आहे. साधारणपणे एका किलोत चार ते पाच फळे बसतात. घाऊक बाजारात तीन डझन मोसंबीचे (मोठ्या आकाराचे फळ) भाव 100 ते 200 रुपये दरम्यान आहेत. लहान आकाराच्या चार डझनची मोसंबीला 30 ते 80 रुपये भाव मिळाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारातून सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील हुबळी, धारवाड परिसरात मोसंबी विक्रीस पाठविली जात आहे, असे ढमढेरे यांनी नमूद केले.