नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकला. त्यासोबतच अन्य काही ठिकाणांवर देखील छापे टाकले.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी येथील नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयावर छापे टाकले.
ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या सिव्हील लाईन्स येथील बंगल्यावर आणि मुंबईच्या वरळी येथील सुखदा अपार्टमेंटमध्ये असलेल्या निवासस्थानी देखील छापे टाकले आहेत. मात्र, शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख अध्यक्ष असलेल्या श्री साई शिक्षण संस्थेवरही छापे टाकले. या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत एनआयटी महाविद्यालय येते.
एनआयटी महाविद्यालयात पॉलिटेक्निक, एमबीए आणि अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. दुपारी 11 वाजताच्या दरम्यान ईडीचे अधिकारी महाविद्यालयात पोहोचले आणि त्यांनी थेट कारवाईला सुरुवात केली. महाविद्यालयाचे अकाउंट्ससह संगणकातील इतर माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी गोळा केली.
विशेष म्हणजे ईडीकडून अनिल देशमुख यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले असून त्यांना मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच त्यांच्या महाविद्यालयावर छापे टाकण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. अनिल देशमुख यांना ईडीनं आजपर्यंत चार वेळा समन्स बजावून देखील ते अजूनही चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. ईडीला सर्वोच्च न्यायालयाकडून आज दिल्या जाणाऱ्या आदेशांची प्रतीक्षा असून अनिल देशमुख नेमके कुठे आहेत, याची आम्हाला माहिती नाही, असे ईडीचं म्हणणे आहे.