इराणमध्ये होणारी निर्यात घटली : किलोमागे 20 रुपये भाव घटले
पुणे – लांबलेल्या पावसामुळे यंदा बासमतीसह इतर तांदळाचे उत्पादन घटले आहे. हंगामासाही दीड ते दोन महिने विलंब झाला आहे. तरीही इराणमध्ये होणारी निर्यात घटल्यामुळे यंदा बासमती तांदळाच्या भावात किलोमागे 15 ते 20 रुपयांनी घट झाली आहे. बासमतीच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केला आहे.
शहा म्हणाले, एप्रिल ते सप्टेंबर 2019 या कालावधीत बासमती तांदळाची निर्यात सुमारे अडीच टक्क्यांनी कमी झाली. कारण इराणबरोबरचा होणारा निर्यात करार साधारणपणे दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान होतो. परंतू आपल्या देशाने इराणकडून खनिज तेलाची आयात किंवा खरेदीवर निर्बंध आणले आहे. त्यामुळे इराणने भारतीय बासमती तांदळाच्या आयातीवर बंदी आणली.
तसेच, युरोपमधील सरकारच्या अन्नधान्य प्रशासनाने खाद्य पदार्थ निर्जंतुक करण्यासाठी, जी जंतुनाशके वापरण्यात येतात. त्यांच्या नियमावलीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे तेथेही बासमती तांदळाच्या आयातीवर बंधने आणली आहेत. परिणामी, आपल्याकडील बासमती तांदळाच्या निर्यात सुमारे 20 टक्क्यांनी घटली आहेत.
एप्रिल ते सप्टेंबर 2019 मध्ये ही निर्यात 21.34 लाख टन आणि सुमारे 15 हजार 331 कोटी रुपये इतकी होती. त्यानंतर ती घटून 20.82 लाख टन म्हणजेच 13 हजार 700 कोटी इतकी झाली. गेल्यावर्षी प्रमाणे बासमती तांदळाची निर्यात सुमारे 40 लाख टन म्हणजेच अंदाजे 26 हजार 800 कोटी रुपयांची होईल, असा अंदाज आहे.
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीतही एप्रिल ते सप्टेंबर 2019 या कालावधीत घट झालेली आहे. गेल्या वर्षी 42.86 लाख टन म्हणजेच 11 हजार 236 कोटी रुपयांची निर्यात झाली. ती घटून यंदा 37.23 लाख टन म्हणजेच 10 हजार 426 कोटी रुपये इतकी झाली.