पुणे : राज्यात बीए, एमए, बीकॉम, एमकॉम, बीएसस्सी, एमएसस्सी या अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरून नियंत्रित होणाऱ्या काही संस्थांचा उल्लेख देखील केला आहे. यामध्ये ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल इज्युकेशन, काऊंसिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडिया, बार काऊंसिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊंसिल ऑफ टिचर्स एज्युकेशन, नॅशनल काऊंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी, शारीरिक शिक्षण व अध्यापनशास्त्र ही व्यावसायिक अभ्यासक्रमे आहेत.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. करोनाची सर्वाधिक केसेसची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अकोला, पालघर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातील विद्यार्थी आणि पालक हे 2019-20 या वर्षाच्या अंतिम परीक्षेबाबत तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंतेत आहेत.
सध्याचे वातावरण हे कोणत्याही परीक्षांसाठी आणि वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. विषाणू प्रादुर्भावाच्या सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे हे विद्यार्थी आणि पालकांबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, परीक्षा घेणारी ऍथॉरिटी, वाहतूक प्रशासन या सर्वांवरचा ताण वाढविणारे आहे.
त्यामुळे राज्य शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना निर्देश देऊन त्यास मान्यता देण्याचे निर्देश द्यावेत व तशा एकसमान सूचना विद्यापीठांसाठी निर्गमित कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.