पुणे – रंगाने लाल, चमकदार, चवीने आंबट-गोड असलेल्या फ्रान्समधील “झिंगी’ वाणाच्या सेंद्रीय सफरचंदांची देशात पहिल्यांदाच आवक झाली आहे. पुणे मार्केट यार्डात सध्या विमानाने 500 किलो आवक झाली आहे. येत्या काही दिवसांत समुद्रमार्गे मोठी आवक होणार आहे. हे सफरचंद पुढील सहा महिने बाजारात उपलब्ध होणार आहे. किरकोळ बाजारात एक किलो सफरचंदांची विक्री 300 रुपये प्रतिकिलो दराने केली जात आहे.
मार्केट यार्ड येथील फळबाजारातील रोहन उरसळ यांच्या गाळा क्रमांक 407 डी.बी. उरसळ ऍन्ड ग्रॅन्ड सन्स येथे ही आवक झाली आहे. फ्रान्समधील अंजोऊ प्रदेशातून ही आवक होत आहे. झिंगी सफरचंद हे एका पनेटमध्ये 6 सफरचंदांचे पॅक असून सुमारे अडीच किलोचा एक ट्रे अशा पॅकिंगमध्ये ही सफरचंद विक्रीस उपलब्ध करून दिली आहेत. लवकरच 21 टन सफरचंदांची आवक होणार आहे. नोव्हेंबरपासून पुढील सहा ते सात महिने हे सफरचंद बाजारपेठांत विक्रीस उपलब्ध असेल, अशी माहिती फळांचे आडतदार रोहन उरसळ यांनी दिली.
उरसळ म्हणाले, “गेल्या पाच वर्षांपासून देशात परदेशी फळांची मागणी वाढत चालली आहे. जागतिक फळबागांमधून आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात या उच्च दर्जाच्या फळांचे वितरण करण्यासाठी डॉन लिमन आणि सायन ऍग्रिकोस या कंपन्यांनी डी.बी. उरसळ आणि ग्रॅन्ड सन्ससोबत भागीदारी केली आहे.’ दरम्यान, दर्जा आणि चव पाहता ही सफरचंद ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असा विश्वासही उरसळ यांनी यावेळी व्यक्त केला.
असे आहे “झिंगी’ सफरचंद
सफरचंदाचे “झिंगी’ हे वाण “इनाटिसने’ या फ्रेंच कंपनीने लॉन्च केले आहे. नावाप्रमाणेच “झिंगी’ सफरचंदांला गोड आणि चटकदार चव आहे. हे सफरचंद अतिशय ज्युसी असून ते आकर्षित लाल रंग, गोल आकाराचे असतात. त्यामुळे ग्राहकदेखील त्याकडे आकर्षित होत आहेत.