कर्मयोगीसह दोन्ही कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात
इंदापूर : नीरा भीमा कारखान्याकडून आगामी गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याची गळीत हंगामासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 23) दिली.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना तसेच शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 च्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि-प्रदिपन समारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाला. हर्षवर्धन पाटील म्हणाले, गत हंगामासाठी कारखान्याने शेतकऱ्यांना रु. 2500 प्रमाणे ऊस बिलाची सर्व रक्कम अदा केली आहे.
कारखान्याच्या देय एफआरपीपेक्षा ही रक्कम रुपये 213 एवढी जास्त आहे. कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला नियमित होत असून, दिवाळीसाठी एक पगार बोनस दिला जाईल. प्रारंभी स्वागत कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी केले. तर प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले.
सत्यनारायणाची महापूजा वृंदावना व हरिदास घोगरे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार देवराज जाधव, सुरेश मेहेर आदी उपस्थित होते.