अहमदाबाद: गुजरातमध्ये मंगळवारी एकाच दिवसातील उच्चांकी 1 हजार 26 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे त्या राज्यातील बाधित संख्येने 50 हजारांचा टप्पा ओलांडला.
गुजरात बाधित संख्येत देशात सातव्या स्थानी आहे.
राज्यात करोना संसर्गाने आणखी 34 बाधित दगावले. त्यामुळे गुजरातमधील करोनाबळींची संख्या 2 हजार 201 इतकी झाली आहे. मृतांच्या संख्येत ते राज्य देशात चौथ्या स्थानी आहे. गुजरातमध्ये सुमारे 12 हजार सक्रिय बाधित आहेत.
राज्यात आतापर्यंत 36 हजारांहून अधिक बाधित करोनामुक्त झाले आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत 5 लाख 62 हजारांहून अधिक करोनाविषयक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या राज्याच्या अहमदाबाद जिल्ह्यात करोनाचा सर्वांधिक फैलाव झाला आहे.
एकट्या अहमदाबाद जिल्ह्यात राज्याच्या जवळपास निम्म्या म्हणजे सुमारे 25 हजार बाधितांची नोंद झाली आहे. त्या जिल्ह्यात करोना संसर्गाने 1 हजार 557 बाधित दगावले आहेत. अहमदाबाद पाठोपाठ सूरत जिल्ह्यात 11 हजारांच्या घरात बाधित आहेत. त्या जिल्ह्यात आतापर्यंत 467 बाधित मृत्युमुखी पडले आहेत.