फलटण – संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार, दि. 20 रोजी फलटण तालुक्यात प्रवेश करणार आहे. फलटण तालुक्यात या सोहळ्यातील एक उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार असून, तरडगाव, फलटण व बरड येथे तीन मुक्काम आणि आठ ठिकाणी सोहळ्याचे विसावे आहेत. या सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासनाने सज्ज झाले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती ढोले यांनी तहसील कार्यालयात शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. तहसीलदार समीर यादव, निवासी नायब तहसीलदार डी. एस. बोबडे, महसूल नायब तहसीलदार एन. डी. काळे, नायब तहसीलदार तुषार देशमुख उपस्थित होते. ढोले म्हणाले, फलटण तालुक्यात तिन्ही पालखीतळांवर आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रे स्थापन करण्यात आली असून, त्यात सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी असतील. वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी शासनाचे 65 टॅंकर्स उपलब्ध आहेत.
दिंड्यांसोबतच्या 450-500 टॅंकर्समध्ये पाणी भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टॅंकरमध्ये पाणी भरण्यासाठी 23 ठिकाणी 34 पॉइंटस् असून, तेथे प्रतिदिन 700 पेक्षा जास्त टॅंकर्स भरण्याची क्षमता आहे. पालखी मार्गावर पाणी शुद्धीकरणासाठी 19 पथके नियुक्त केली आहेत. सर्व ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.
तरडगाव, फलटण व बरड येथील मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांच्या स्वच्छतेसाठी वेगळे कर्मचारी नेमण्यात आले असून, पाण्यासाठी वेगळे टॅंकर्स असतील. पालखीतळांवर मुक्कामापूर्वी, मुक्कामादरम्यान आणि मुक्कामानंतरच्या स्वच्छतेसाठी संबंधित ग्रामपंचायती व नगरपरिषदेने नियोजन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही अतिरिक्त 150 कर्मचारी दिले आहेत. आरोग्य विभागाची 14 स्थिर पथके, दुचाकीवरील आरोग्यदुतांची 17 पथके वैद्यकीय सेवेसाठी नेमण्यात आली आहेत.
पालखी मार्गावर प्रत्येक किलोमीटरला एक, याप्रमाणे 33 रुग्णवाहिका आणि चार कार्डिऍक रुग्णवाहिका सज्ज असतील. तालुक्यामधील रुग्णालयांमध्ये 190 खाटा वारकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात जिल्हास्तरावरुन तज्ज्ञ डॉक्टर नेमण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यावेळी अखंडित वीजपुरवठ्याची दक्षता घेण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी 17 मंगल कार्यालये आणि आठ पेट्रोल पंपांवर विश्रांतीगृहे तयार करण्यात आली आहेत. पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, भुरट्या चोरांच्या बंदोबस्तासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक तळावर 24 बाय 7 निर्भया पथक असेल.
पालखी मार्गावर बंद पडलेली वाहने बाजूला करण्यासाठी आठ क्रेन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पालखीतळावर अग्निशमन दलाची दोन वाहने आणि पोलीस वाहनांमध्ये 50 अग्निशमन सिलिंडर्स ठेवण्यात येणार आहेत. दि. 18 ते दि. 23 या काळात तहसील कार्यालयात 24 बाय 7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, तेथील संपर्क क्रमांक (02166) 222210 हा आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेल्या पुस्तिकांचे वाटप सर्व दिंड्यांमध्ये करण्यात येईल, असेही ढोले यांनी सांगितले.
वारकऱ्यांना सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन
फलटण तालुक्यात पालखी सोहळ्याच्या काळात नागरिकांनी आपल्या घरांमधील शौचालये वारकऱ्यांना वापरायला देऊन, स्वच्छता राखण्यास मदत करावी, असे आवाहनही सचिन ढोले यांनी केले आहे.