तीन प्रमुख नेत्यांचे पत्ते झाकलेलेच!

सम्राट गायकवाड

उत्कंठा शिगेला, पहिला ठोका टाकणार कोण याकडे साऱ्यांच्या नजरा

उदयनराजेंचा सस्पेन्स कायम

शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप प्रवेश होऊन आता जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होईल. मात्र, अद्याप उदयनराजेंनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. उदयनराजेंची आजपर्यंतची राजकीय वाटचाल पाहिली तर एवढ्या मोठ्या कालावधीत ते प्रथमच व्यक्त होण्यापासून दूर राहिले आहेत. परिणामी सस्पेंस वाढला आहे. राजे कधी व्यक्त होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

सातारा  – पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या चर्चांचे धुराडे पुन्हा पेटले आहे. मास लीडर असणारे तीन दिग्गज नेते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होत राहिला आहे. त्यापैकी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले ज्यांनी तूर्त मौन धारण केले आहे. तर तिसरे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रचार दौरे सुरू केले असले तरी अद्याप भविष्यात कोणता राजकीय निर्णय घेणार, याचे पत्ते अद्याप उघडले नाहीत.

परिणामी तिघांच्या नजरा परस्परांच्या हालचालीवर आहेत. तिघांपैकी जो नेता पहिली चाल खेळेल, त्यावरच उर्वरित नेत्यांकडून पुढील डाव खेळला जाणार आहे. त्यामुळे समर्थकांची, विरोधकांची आणि जिल्हावासियांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. तेव्हा पहिला ठोका कोण टाकणार, हे पाहणे रंजक असणार आहे.

सद्यस्थितीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला तडे जाऊ लागले आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासारखा बुरूज ढासळला आहे. त्यानंतर पुरपरिस्थितीमुळे राष्ट्रवादीला “डॅमेज कंट्रोल’साठी काही अवधी मिळाला. मात्र, तरीदेखील राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे आह,े ते रामराजे यांच्या भाजप पक्षप्रवेशाचे वृत्त समोर येत आहे. त्याबाबत रामराजे अथवा समर्थकांनी अद्याप खंडन अथवा समर्थनही केले नाही.

परंतु, जेव्हा एखाद्या विषयाच्या बाबतीत कोणतेच मत व्यक्त केले जात नाही, तेव्हा ती भूमिका सहमत असते, असे ग्राह्य धरले जाते. परिणामी रामराजे राष्ट्रवादी सोडणार हे जवळपास ग्राह्य मानले जाऊ लागले आहे. मात्र, रामराजेंचे जिल्ह्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन प्रमुख राजकीय विरोधक आहेत. त्यापैकी उदयनराजेंनी तूर्त मौन धारण केले आहे. त्याचप्रमाणे रामराजेंचे दुसरे प्रत्यक्ष विरोधक आमदार जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभेच्या निमित्ताने फलटण विधानसभा मतदारसंघात आव्हान निर्माण केले आहे.

रामराजेंप्रमाणे गोरे यांच्यादेखील भाजप प्रवेशाचे तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु, अद्याप गोरेंनी पत्ते उघडले नाहीत. एकाबाजूला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या निमित्ताने ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. तर दुसऱ्या बाजूला सहकारी समर्थकांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करीत आहेत. परिणामी आगामी काळात गोरे 2009 चा पॅटर्न वापरतात की काय, अशीदेखील शक्‍यता वर्तविली जात आहे. सद्यस्थितीत तिन्ही नेत्यांना पक्षाने भरभरून दिले आहे. मात्र, सत्तेपुढे शहाणपण नसते, या मागील पाच वर्षांतील अनुभवामुळे तिन्ही नेत्यांमध्ये व्दिधा मनस्थिती निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातून पहिला मोठा भाजपप्रवेश शिवेंद्रसिंहराजेंच्या निमित्ताने झाला आहे. ते राष्ट्रवादी सोडणार, याचे संकेत सर्वप्रथम उदयनराजेंनी मुंबईच्या बैठकीत झालेल्या खडाजंगीनंतर दिले होते. संकेतानुसार पहिला प्रवेश झाला मात्र दुसरा कधी होणार, याची बहुधा प्रतीक्षा उदयनराजे करीत असावेत.

दुसरा प्रवेश झाल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सुत्रे आपसुक उदयनराजे व आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे येणार आहेत. दोघांपैकी उदयनराजेंची निवडणूक झाली आहे. त्या निवडणुकीचे शिवधनुष्य शशिकांत शिंदे यांनी पेलले होते. परिणामी आगामी निवडणुकीत शिंदे यांना विजयी करून एका दगडात अनेक पक्षी मारण्याची खेळी खेळली जाऊ शकते. परंतु, हा सर्व जर- तरचा राजकीय खेळ आहे. तसा बुध्दीबळाचा पटही आहे. तेव्हा पहिली चाल कोण खेळणार, हे परस्परांच्या हालचालींवर ठरणार आहे. त्यासाठी आचारसंहिता घोषित होईपर्यंत आणि युतीचे जागावाटप होईपर्यंत वाट पाहवी लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)