सातारा – पंचम ग्रुप सातारा आणि व्हायोलिन अकादमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तिरंग हा कार्यक्रम रविवार दि. 18 रोजी संध्याकाळी शाहु कला मंदिर येथे झाला. या कार्यक्रमाची सुरूवात शौनक अभिषेकी आणि मंजुषा पाटील वारकरी संप्रदायाच्या जय जय राम कृष्ण हरी या मुलमंत्राने केली. या कार्यक्रमाचे निरूपण करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार श्रेयस बडवे यांच्या यांच्या निरूपणाबरोबर शौनकजींनी त्यांच्या अनेक लोकप्रिय भक्तिरचना (अभंग) सादर केले.
यामध्ये अबीर गुलाल उधळीत रंग, हरी भजना वीण काळ.. या सारख्या अभंगानी रसिकांनी टाळ्यांच्या गजराने शौनकजींना दाद दिली. यानंतर मंजुषाताईं मंचावर आल्या त्यांनी “अवघाची संसार’ या अभंगाने सुरूवात करून पुढे त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण गायनातील रसिकांना नेहमीच आवडणाऱ्या “श्रीरंगा कमलाकांता’ “अवघे गरजे पंढरपूर’ अशा भक्तीरचना सादर केल्या. यामध्ये त्यांनी त्यांच्या खास अभंगाची शृंखला ही सादर केली. यामध्ये एका पाठोपाठ काही अभंगाचे एक एक चरण गावुन रसिकांना मेजवानी दिली.
शौनकजी आणि मंजुषाताईं या शास्त्रीय गायकी बरोबरच अभंग नाट्यगीत या गायन प्रकारामध्ये सुद्धा आपापल्या वैशिष्ट्य पूर्ण गायकीने रसिकांना परिचीत आहेत. त्यामुळे रसिकांनी या कार्यक्रमाला खुप गर्दी केली होती. आणि दोघा कलाकारांनी रसिकांना भरपूर आनंद दिला. श्रेयस बडवे यांचे अत्यंत प्रासादिक आणि अभ्यासपूर्ण निरूपणाने कार्यक्रमाला वेगळीच उंची लाभली. एका पाठोपाठ गायल्या गेलेल्या अभंगांमध्ये बडवे यांच्या निरूपणाने सर्व रचना भक्तिरसाच्या एका मालिकेत गुंफल्या गेल्या. या कार्यक्रमाला तितकीच तोलामोलची साथ तबल्यावर प्रशांत पांडव, पखवाजवर ओंकार दळवी, संवादिनीवर तन्मय देवचक्के यांनी केली.
स्वरसाथीसाठी शौनकजी आणि मंजुषाताईंचे शिष्य होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचमचे अमेय आगटे यांनी केले. पंचमचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, उपाध्यक्ष गिरीश कुलकर्णी आणि व्हायोलिन अकादमीचे राजस उपाध्ये यांनी शौनकजी आणि मंजुषाताईंचे स्वागत व सत्कार केला. बाकी सहकलाकारांचा सत्कार पंचमच्या कार्यकारीणी सदस्यांनी केला.