पुण्यातील शिक्षण संस्थांचे पाऊल काश्‍मीरकडे!

शिक्षणक्रम, कॉलेजसाठी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह “सरहद’ संस्थेशीही पत्रव्यवहार

पुणे – जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर पुण्यातील 7 शिक्षण संस्थांनी काश्‍मीरमध्ये कॅम्पस सुरू करण्यासाठी प्राथमिक तयारी दाखविली आहे. मात्र, सध्या ही प्राथमिक स्थिती असून काश्‍मीरमधील वातावरण पूर्वपदावर आल्यानंतर किती संस्था प्रत्यक्षात तेथे कॉलेज सुरू करतील, हेच आता पाहावे लागेल.

यासंदर्भात “सरहद’चे प्रमुख संजय नहार म्हणाले, “आता आम्ही पुन्हा एकदा पुण्यातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधला. त्यात फर्गसन कॉलेज, व्हीआयटी, अर्हम यांसह 25 शिक्षण संस्थांचा समावेश आहे. काश्‍मीर आणि कारगिलमध्ये त्यांनी शाखा सुरू करावी, असे आवाहन केले. यापैकी सध्या सात जणांनी यासाठी तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काश्‍मीरमध्ये कॅम्पस सुरू करण्याविषयीचे पत्र पाठविले आहे. त्यात पदवी व पदव्युत्तर शिक्षण सुरू करण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे. तर, काही शिक्षण संस्थांनी “वेट ऍन्ड वॉच’ ही भूमिका घेत प्रत्यक्षात तेथील वातावरण शिक्षणासाठी पूरक असेल, तेव्हाच संस्था सुरू करणे योग्य राहील, असेही काही शिक्षण संस्थांचे म्हणणे आहे.

या संस्थांच्या नावांची चर्चा
एमआयटी युनिव्हर्सिटी, वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, अर्हम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थांच्या व्यवस्थापनाने “सरहद’ या पुण्यामधील स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधत आपण काश्‍मीरमध्ये कॉलेज सुरू करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. या तिन्ही संस्थांनी तसे पत्र दिले आहेत. अन्य चार संस्थांचे पत्र दोन दिवसांत मिळतील. त्यात विश्‍वकर्मा विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठासह अन्य संस्थांची नावे चर्चेत आहेत.

सिम्बायोसिस विद्यापीठाने काश्‍मीर येथे शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची एक समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आठ दिवसांत येईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. मात्र, देशातील नामवंत शिक्षण संस्थांना काश्‍मीर खोऱ्यात “पीपीपी’ तत्त्वावर कॅम्पस सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. आमची काश्‍मीरमध्ये शाखा सुरू करण्याची इच्छा आहे. त्यासाठी सरकारकडून आर्थिक पाठबळ हवे.
– विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिम्बायोसिस विद्यापीठ

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)