सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
सांगवी – पिंपळे गुरव येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ठराविक पत्रशेडवरच कारवाई केली. अतिक्रमण विरोधी पथकाला सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचावे लागत असल्याने अतिक्रमण विरोधी पथक स्वतःवर नामुष्की ओढवून घेत आहे, अशी परिसरात चर्चा सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
अतिक्रमण विरोधी पथकाने आवकजावक क्रमांकाचा थांगपत्ता नसलेल्या नोटिसा गेल्या आठवड्यात अनधिकृत पत्राशेडला चिकटविल्या होत्या. ज्यामधून अनधिकृत पत्राशेडला अगदी खेटून असलेली पक्की बांधकामे सोयीस्करपणे वगळली आहेत. कारण काय तर ही पक्की बांधकामे सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांची आहेत, अशी उघड चर्चा पिंपळे गुरव परिसरात सुरू आहे.
नोटिसा आल्याने नागरिकांनी स्वतःहून आपले पत्राशेड काढून घेतले. जेणेकरून नुकसान टाळता येईल. कारण या परिसरात गेल्या वर्षभरात झालेली ही पाचवी कारवाई होती. पाचही कारवायांमध्ये ठराविक बांधकामे, पत्राशेड सोयीस्करपणे वगळली आहेत. काहींनी स्वतःहून काढून घेतलेल्या पत्राशेडचे फक्त लोखंडी खांब उभे दिसत होते. या पथकाने हे खांबही जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकले. मात्र, शेजारील संपूर्ण पत्राशेड या कारवाईतून वगळले आहे. हा दुजाभाव का, असा प्रश्न जनतेला पडला आहे.
आयुक्तांनी कारवाईत दुजाभाव करीत असलेल्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कायद्यात तरतूद असून, सेक्शन 44 अंतर्गत आयुक्तांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.
दोन तीन महिन्यांपूर्वीही पिंपळे गुरव येथील ठराविक पत्राशेडवर कारवाई करण्यात आली होती. आज पिंपळे गुरवमध्ये नदीपात्रालगत शंभरहून अधिक अनधिकृत पत्राशेड आहेत. मात्र, केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे अधिकारी कारवाईस टाळाटाळ करतात. संपूर्ण शहरातच अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकारी याकडे गंभीरपणे पाहत नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
20 पत्राशेडवर कारवाई
पावसाळ्यात शहरात उद्भवलेल्या पूर परस्थितीनंतर नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने महत्त्वाचे आदेश दिले. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने नदी पात्रातील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. पिंपळे गुरवमध्ये शनिवारी (दि.15) 20 पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले. पिंपळे गुरवमध्ये राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशानुसार नदीपात्रालगतच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक परिसरातील नदीपात्रालगतचे 10 पत्राशेड संबधितांनी स्वत:हून काढून घेतले. त्यामध्ये सुमारे 12 हजार 500 चौरस फुट इतके क्षेत्र मोकळे करण्यात आले. तर, तेथील सुमारे 25 हजार चौरस फुटांच्या 20 पत्राशेडवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.