असुविधा : देखभाल दुरुस्ती अभावी सीसीटीव्ही कॅमेरे बंद
कामशेत – तीन वर्षांपूर्वी कामशेत बाजारपेठेत नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी व्यापारी असोसिएशन व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; मात्र देखभाल दुरुस्ती अभावी कामशेत बाजारपेठेतील सर्व कॅमेरे बंद आहेत. कॅमेरे कुणी दुरुस्त करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत आणि व्यापाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बाजारपेठ असुरक्षित असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तीन वर्षांपूर्वी कामशेत बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या पेढी व अन्य दुकानदार यांच्या सुरक्षितेसाठी व बाजारपेठेवर पोलिसांचे नियंत्रण ठेवण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिलेल्या सूचनेनुसार बाजारपेठेत व्यापारी असोसिएशनच्या वतीने पाच तर ग्रामपंचायतीच्या वतीने एक असे एकूण सहा अत्याधुनिक कॅमेरे बाजारपेठेत बसविण्यात आले होते. त्यामुळे कामशेत बाजारपेठेतील सर्व हालचाली कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात दिसत होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी, रोडरोमिओ, सोनसाखळी चोर, पाकीटमार व घरफोड्या यांसारख्या गुन्ह्यांवर पोलिसांना नियंत्रण ठेवणे शक्य होणार होते; मात्र ज्यावेळी कॅमेरे बसविण्यात आले. तेव्हापासून सहाचे सहा कॅमेरे कधी सुरू झालेच नाहीत. कालांतराने कामशेत बाजारपेठेत झालेल्या घरफोडीच्या घटनानंतर पोलिसांनी कॅमेरे पुन्हा दुरुस्त केले होते; मात्र त्यानंतर त्या कॅमेऱ्याकडे दुर्लक्ष झाल्याने बाजारपेठेतील सर्वच्या सर्व कॅमेरे धूळखात आहेत.
पोलीस ठाण्याच्या माध्यमातून व लोकसहभागातून कामशेत बाजारपेठेत कामशेत बाजारपेठेत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च नेमका करायचा कोणी हे न ठरविल्याने आता सगळेच हातवर करीत आहेत. व्यापारी संघटना पोलीस व ग्रामपंचायतीकडे बोट दाखवत आहे, तर पोलीस लोकसहभागातून देखभाल दुरुस्ती व्हावी, असे म्हणत आहेत. त्यामुळे नक्की देखभाल दुरुस्तीचा खर्च करायचा कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कामशेत बाजारपेठेमुळे कामशेत हे गर्दीचे ठिकाण बनले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कॅमेरे आवश्यक आहेत. त्यामुळे जुने कॅमेरे दुरुस्त करणे गरजेचे आहेत. यासाठी लोकसहभागातून व्यापारी व नागरिकांनी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
– विठ्ठल दबडे, पोलीस निरीक्षक, कामशेत पोलीस ठाणे.