22 वर्षांपासून फरारी खुनी आरोपीस अटक

शिरवळ – शिंदेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये शिरवळ-भोर रस्त्यावर सुमारे 22 वर्षांपूर्वी एका बस कंडक्‍टरचा पूर्ववैमनस्यातून एस.टी. बसमध्येच प्राणघातक हल्ला करून मृत्यूस जबाबदार असणाऱ्या फरारी आरोपीस शिरवळ-खंडाळा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. बाळू उर्फ बाळासाहेब गेनबा तुंगतकर (वय 46, बारे बु।।, ता. भोर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबतची खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशान्वये शिरवळ, खंडाळा पोलीसचे कर्मचारी आपल्या रेकॉर्डवरील फरार गुन्हेगारांचा शोध घेत होते. यावेळी खंडाळा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर खून प्रकरणात फरारी असलेला आरोपी बाळू उर्फ बाळासाहेब गेनबा तुंगतकर हा बारे बु. ता.भोर, जि.पुणे हा त्यांच्या निदर्शनास आला. दि. 2 ऑक्‍टोबर 1997 रोजी भोर-शिरवळ रस्त्यावर शिंदेवाडी, ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये एस.टी. बस (क्र. एमएच-12-इएफ-3351) वरील वाहक भिमाजी भिकोबा मळेकर (वय 45, रा. बारे बु. ता.भोर, जि.पुणे) याचा पूर्ववैमनस्यामधून राजाराम तुंगतकर यांच्यासह दहा ते पंधरा जणांनी त्याचा एस. टी. बसमध्येच निर्घृण खून केला होता.

बाळू उर्फ बाळासाहेब तुंगतकरसह तीन जण हा खून झाल्यापासून म्हणजेच 22 वर्षांपासून फरारी झाला होता. याबाबत गोपनीय माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांना मिळाली. त्यानुसार शिरवळ पोलीस स्टेशनचे पो.नि.विनायक वेताळ यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, स.फौ. पांडुरंग हजारे, राजू अहिरराव, पो. हवा. विकास इंगवले, वैभव सूर्यवंशी, सचिन वीर, प्रशांत धुमाळ, दत्तात्रय धायगुडे, आप्पा कोलवडकर, स्वप्नील दौंड, सुभाष धुळे, अमोल जगदाळे, नितीन महांगरे यांच्या संयुक्तिक पथकाने बारे बु।। येथे सोमवार दि. 1 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास सापळा रचला. यादरम्यान, बाळू बाळासाहेब तुंगतकर याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेत शिरवळ – खंडाळा पोलिसांनी अटक करत शिरवळला घेऊन आले. दरम्यान, आरोपहि खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास स.पो.नि. हनुमंत गायकवाड करीत आहेत.

22 वर्षांपासून फरारी खुनी आरोपीस अटक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.