जामखेड येथे आगीत कापड दुकान खाक 

25 लाख रुपयांचे झाले नुकसान ः पहाटेच्या सुमारास घडला प्रकार 

जामखेड – शहरातील बाजारतळ येथील यशवंत कलेक्‍शन या कापड दुकानास अचानक आग लागून दुकानातील रेडिमेड कपडे, फर्निचरसह अन्य वस्तू जळून खाक झाल्या. हा प्रकार आज पहाटे दोनच्या सुमारास घडला. या आगीत सुमारे 25 ते 30 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक राजेश कल्याण भोगील व अजिनाथ जगन्नाथ जायभाय यांनी दिली. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नसले, तरीही शॉर्टसर्किटने ही घटना झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोमवारी (दि.1) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून दुकानाचे मालक घरी निघून गेले. त्यानंतर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, सुरक्षारक्षक भरतसिंह राजपूत यांनी दिसले. त्यांनी अग्निशामक दल व पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केली. त्यामुळे आजूबाजूच्या दुकानांचे नुकसान टळले. त्यानंतर तातडीने या घटनेची खबर दुकानमालक राजेश भोगील व अजिनाथ जयभाय यांना दिली. ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, आग लागल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर दुकानासमोर मोठी गर्दी जमा झाली. तर ही आग विझविण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन गाडीला बोलवण्यात आले. मात्र, या गाड्या येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे दुकानातील रेडिमेड कपडे, कॉम्प्युटर, इन्व्हर्टर, बॅटरी असे मिळून जवळपास 25 ते 30 लाखांचे साहित्य जाळून खाक झाले आहेत. दुकानाला ज्या काचा लावण्यात आल्या होत्या, त्याही आगीने फुटल्या होत्या. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्‍यात आली. या आगीमुळे दुकानात कांहीच शिल्लक राहिले नाही. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश साने, तसेच अग्निशामक दलाचे शंकर बोराटे, आय्यास शेख, अहमद शेख, विजय पवार यांनी मदत केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.