नवी दिल्ली – देशभरात राजकीय प्रभाव निर्माण करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या आम आदमी पक्षाला (आप) बुधवारी एकाच दिवशी तीन धक्के बसले. गुजरातमधील त्या पक्षाच्या एका उमेदवाराने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. तर, दिल्ली पालिका निवडणुकीसाठी तिकीट विक्री केल्याच्या आरोपावरून आप आमदाराच्या नातलगाला अटक झाली.
त्याशिवाय, दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यातील आरोपी असणाऱ्या व्यावसायिकाला माफीचा साक्षीदार बनण्याची परवानगी मिळाली. त्या घडामोडी आपची कोंडी करणाऱ्या आहेत. तसेच, भाजप आणि कॉंग्रेस या गुजरात, दिल्लीतील प्रमुख प्रतिस्पर्ध्यांना आपला घेरण्याची आयती संधी मिळवून देणाऱ्या आहेत.
दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यंदा महापालिका ताब्यात घेण्याच्या ईर्ष्येने आम आदमी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला असतानाच पक्षाच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवणारा प्रकार समोर आला आहे. महापालिका उमेदवारीसाठी पैसे मागितल्याप्रकरणी आपचे आमदार अखिलेशपती त्रिपाठी यांच्या एका नातलगासह तीन जणांना दिल्ली पोलिसांच्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपच्या कार्यकर्त्या शोभा खारी यांनी महापालिकेसाठी उमेदवारी मागितली होती. पक्षाचे तिकीट मिळवून देण्यासाठी त्रिपाठी यांच्या मेहुण्याने खारी यांच्याकडून 90 लाख रुपयांची मागणी केली. ओम सिंह असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पैसे घेण्यासाठी खारी यांच्या घरी आले असतानाच तिघा आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.