हार्दिक पंड्याला ( Hardik Pandya ) न्यूझीलंड दौऱ्यावरील टी-20 मालिकेला संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेसाठी हर्दीकडे नेतृत्व दिले असल्याने त्याला टी-20 संघाचा पुढील नियमित कर्णधारही म्हटले जात आहे. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर संघातील काही खेळाडू ऑस्ट्रेलियाहून थेट न्यूझीलंडला पोहोचले आहेत. पुढील 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाबाबत बोलताना पंड्या म्हणाला की, टीम इंडियाचं लक्ष्य आतापासूनच सुरू झाल आहे.
ODI WorldCup | वनडे वर्ल्डकप 2023 भारतातच, ‘या’ शहरांत होणार सामने
पंड्या ( Hardik Pandya ) म्हणाला की, “होय, विश्वचषकातील वाट्याला आलेली निराशा आपल्या सर्वांनाच माहीत आहे, परंतु आम्ही खेळाडू आहोत आणि आम्हाला त्याचा सामना करणे आवश्यक आहे. आपण आपल्या यशाला कसे सामोरे जाऊ, आपल्या अपयशांना कसे सामोरे जाऊ आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करू. पुढचा टी-20 विश्वचषक होण्यासाठी अजून दोन वर्षांचा वेळ आहे. या काळात भरपूर क्रिकेट खेळायचे असून अनेकांना खेळण्याची संधी मिळणार आहे.”
पुढे बोलताना पंड्या ( Hardik Pandya ) म्हणाला की, “तयारी सुरू झाली आहे पण त्यासाठी अजून वेळ आहे. त्या सर्व गोष्टींवर आम्ही एकत्र बसून चर्चा करू. सध्या आमचे लक्ष्य न्यूझीलंडमधील खेळाचा आनंद घेण्यावर आहे. त्यामुळे आपण पुढच्या टी-20 विश्वचषकाबद्दल नंतर बोलू.” असेही हार्दिकने म्हटले आहे.
भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये तीन टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. शिखर धवनला वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र या दोन्ही मालिकांसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या दौऱ्यावर युवा खेळाडू आपला दम कसा दाखवतात ते पाहणे महत्वाचे असणार आहे. दोन्ही देशामध्ये पहिला T20 सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे.