पुणे – महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची गाडी अखेर रुळावर येणार आहे. आरोग्य विभागाकडून यासाठी सुचविण्यात आलेल्या पर्यायांचे सादरीकरण मंगळवारी आयुक्तांपाठोपाठ महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. त्यांनी या सर्वच पर्यायांचा सविस्तर अहवाल देऊन पुढील आठवड्यात हा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्याचे आदेश दिले.
महापालिकेकडून दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून सल्लागार नेमला होता. या सल्लागाराने महाविद्यालय करणे शक्य असल्याचा अहवाल दिला असून त्यासाठी 3 प्रमुख पर्याय सूचवले आहेत. त्यात वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करणे, पीपीपीमध्ये महाविद्यालय सुरू करणे अथवा बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे असे पर्याय दिले आहेत. या सर्व पर्यायांचे सादरीकरण महापौरांसह पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पर्यायांचे सविस्तर फायदे आणि तोटे नमूद करून तीनही पर्यायांसह प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव पुढील आठवड्यात स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
पक्षनेत्यांसमोरही होणार प्रस्तावाचे सादरीकरण
स्थायी समितीत प्रस्ताव निश्चित झाल्यानंतर या पैकी ज्या प्रस्तावास स्थायी समितीकडून मान्यता दिली जाईल. त्या प्रस्तावानुसार ज्या ठिकाणी अशा प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू आहे त्या महाविद्यालयाची संयुक्त पाहणी करून माहिती घेतली जाणार आहे. तर स्थायी समितीत प्रस्ताव आल्यानंतर सर्व पक्षनेत्यांनाही याबाबतचे सादरीकरण करण्यात येणार आहे.