भीमा खोऱ्यात पावसाचा जोर ओसरला : कृष्णा खोऱ्यात कायम
पुणे – पुणे विभागातील भीमा खोऱ्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, कृष्णा खोऱ्यात जोर अद्यापही कायम आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरस्थिती अजूनही गंभीर असली तरी मदत व बचावकार्य सुरू आहे. विभागातील 1 लाख 32 हजार 360 पूरबाधितांना सुरक्षितस्थळी हलविल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान, पुरामुळे पुणे विभागात 16 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
पूरस्थिती आणि बचाव कार्याची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील 136 गावे पुरामुळे बाधीत झाली असून 51 हजार 785 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. सातारा जिल्ह्यातील 6 गावे पुरामुळे बाधीत झाली असून 6 हजार 262 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. सांगली जिल्ह्यातील 18 गावे पुरामुळे बाधीत झाली असून 53 हजार 281 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार 749 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. पुणे जिल्ह्यातील 13 हजार 336 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच बचाव व पुनर्वसन कार्यात नागरिकांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.
बंगळुरू मार्ग बंद
पुणे-बंगळुरू महामार्गावर 3 ठिकाणी पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूरला जाणारी तसेच बंगळुरूहून कोल्हापूरला जाणारा महामार्ग दोन्ही बाजूने बंद आहे. त्यामुळे कोल्हापूरला रस्त्याने जाणे शक्य नाही. त्यामुळे कोल्हापूरचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील 89 रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
आणखी पथके रवाना
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6 एनडीआरएफची पथके पोहोचली असून आणखी 6 पथके रवाना होत आहे. तर एक नौदलाचे पथक पोहोचले आहे. कोल्हापूरमध्ये प्रादेशिक सैन्यदलाचे 4 पथके कार्यरत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये 3 एनडीआरएफची पथके दाखल झाली असून आणखी 3 पथके रवाना होणार आहेत. तर सातारा जिल्ह्यामध्ये 1 एनडीआरएफचे पथक पोहोचले आहे.