त्याचेही बरोबर आहे…

बसमधून जाताना कधी कधी मोठे गमतीदार प्रसंग पाहायला मिळतात. बसमधून प्रवास करताना गर्दी, ढकलाढकली, कंडक्‍टरबरोबर भांडण हे तर नेहमीचेच प्रकार. सुटे पैसे हा एक वादाचा आणखी प्रकार. पाच किंवा दहा रुपयांच्या तिकिटासाठी शंभराची नोट काढणारे प्रवासी म्हणजे कंडक्‍टरसाठी डोकेदुखीच. विशेष करून बसच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये असे नोटांचे शतकवीर प्रवासी निघाले की कंडक्‍टरपुढे प्रश्‍न पडतो. अनेकदा प्रवासीजवळ सुटे पैसे असूनही मोठ्या नोटा काढतात. आणि कंडक्‍टरने सुटे पैसे नाहीत, तिकिटावर लिहून देतो. मग डेपोमधून बाकी पैसे घेऊन जा, असे सुनावले की मग खिशातून किंव पर्समधून सुटे पैसे बाहेर काढतात.

बसमधील प्रवासात भांडणाचा आणखी एक नित्याचा मुद्दा म्हणजे राखीव जागा. बहुतेक सर्वच बसेसमध्ये महिलांसाठी बसची एक संपूर्ण बाजू ूराखून ठेवलेली असते. पण तरीही उजव्या बाजूच्या सीट्‌सवर महिला बसतात. डावी बाजू रिकामी असली, तरीही का कोण जाणे, पण उजव्या बाजूला महिला सर्रास बसलेल्या दिसतात. बसच्या अगदी सुरुबातीच्या स्टॉपवरसुद्धा बसमध्ये चढलेल्या महिला महिलांसाठी राखीव डावी बाजू सोडून उजव्या बाजूला बसताना दिसतात. कधी कधी डाव्या बाजूल ऊन येते असे कारण सांगतात. क्वचित कधीतरी कंडक्‍टर महिलांना डाव्या बाजूला बसा म्हणून सांगतो. पण त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. डाव्या बाजूला मात्र एक तर पुरुष प्रवासी सहसा बसणे टाळतात. कारण महिलांसाठी राखीव आहे, असे सांगून एखादी युवतीसुद्धा एखाद्या वयस्क माणसाला उठवताना दिसते. आणि तो बिचारा निमूटपणे उठतो. उलटपक्षी उजव्या बाजूला बसणाऱ्या महिलांना डावीकडे बसा असे सांगण्याचे धाडस सहसा युवकवर्ग तर सोडा, पण ज्येष्ठ नागरिकही करत नाहीत.

अनेकदा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या जागांवर महिला-मुली बसतात. इतर जागा रिकामी असूनही. मग कधी एखादा उत्साही प्रवासी एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला बसायला मिळावे म्हणून त्यांच्या जागी बसलेल्या युवतीला जागा देण्यासाठी सांगू लागला, तर जाऊ द्या हो, बसू द्या. आमच्या लेकीबाळींना उभे राहायला सांगायली बरे वाटत नाही, म्हणून तो ज्येष्ट नागरिक स्वत: उभा राहतो. मात्र स्वत:हून जागा देण्याची प्रवृत्ती दिसेनाशी झालेली आहे.

मी सांगते ती घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. मी कर्वेनगरला जात होते. बसला नेहमी प्रमाणे गर्दी होतीच. पुढे उजव्या बाजूच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सीटवर दोन तरुण बसले होते. बस पुणे स्टेशनवरून आली होती. डेक्कनला चढलेल्या प्रवाशांमध्ये तीनचार ज्येष्ठ नागरिक होते. त्यापैकी एकाने पहिल्या सीटवर बसलेल्यांना आपल्याला जागा देण्याची विनंती केली. त्या दोघांपैकी एकजण तत्परतेने उठला आणि त्याने त्या ज्येष्ठ नागरिकाला बसण्यासाठी जागा करून दिली. त्या ज्येष्ठ नगरिकाने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धन्यवाद देताना म्हटले, सॉरी बेटा, तुला उभा राहायला लावले. पण मला उभे राहून प्रवास जमत नाही हल्ली.

यावर त्या मुलाने, काही हरकत नाही. बसा तुम्ही. तुमच्यासाठीच राखीव आहे जागा. आणि नसती तरी मी तुम्हाला जागा दिली असती. आम्ही मुले उभे राहून प्रवास करू शकतो. काय 15-20 मिनिटांचा तर प्रश्‍न आहे. असे समंजस उत्तर दिले. मात्र त्याच्या शेजारचा मुलगा अगदी मख्खपणे समोर बघत बसला होता. आपल्या उठायला सांगितले आहे, समोर वृद्ध माणूस आहे, याकडे तो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होता.

काय रे भाऊ, तुला ऐकायला आले नाही का? असे तिसऱ्याच एका प्रवाशाने त्याचा उद्दामपणा सहन न होऊन त्याला विचारले. तरीही त्याने लक्ष दिले नाही. तेव्हा त्याच्या डोक्‍याला हात लावून त्या गृहस्थाने म्हटले, अरे भाऊ, या आजोबांना बसायला जागा दे. तुला कळत नाही का?

हे ऐकतात एकदम संतप्त होऊन तो मोठ्याने ओरडला, ओ ड्रायव्हर, गाडी थांबवा. पण ड्रायव्हर कशाला मागे लक्ष देतो. त्या मुलाचे ते ओरडणे ऐकून बाकी सारेच संतापले. सर्वांनी आता जोर लावून त्या मुलाला उठवले आणि त्या वृद्धाला बसायला जागा दिली.

रागारागाने तो उठून ड्रायव्हरकडे गेला आणि ओरडून म्हणाला, हे मला बसायला देत नाहीत, मी स्टेशनवरून बसून आलो आहे. असले कसले तुमचे नियम? मला इथेच उतरवा. आणि रागारागाने बसमधून मधेच उतरून तो निघून गेला. अगदी सुरुवातीच्या थांब्यावर राखीव जागा ठीक आहे, पण दूर जाणाऱ्या प्रवाशाला कोणी खास करून उभी राहू शकणारी व्यक्ती उठवत असेल तर ते ठीक नाही, हे पटण्यासारखे आहे. आता ज्येष्ठांसाठी जागा देणे ठीक आहे.

– विद्या शिगवण

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.