गाझीपूर – हाय टेंशन वायर चालत्या बसवर पडल्याने बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये घडली आहे. या आगीच्या घटनेत बसमधील 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ११हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही दुर्घटना एका लग्न सोहळ्यातून परतत असताना घडली. या बसमधून सुमारे 30 प्रवासी प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मर्दाह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाहर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
ही बस कच्च्या रस्त्यावरून मऊ जिल्ह्यातील कोपा येथून लग्नाची मिरवणूक घेऊन मर्दाह येथील महाहर धामकडे येत होती. त्यावेळी हाय टेंशन वायर चालत्या बसवर पडली. जवळपास 11000 वोल्टचा विद्युत प्रवाह बसवर पडल्याने बसला भीषण आग लागली. या आगीत बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून, 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि मोबाईल फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाने बसला लागलेली आग विझवली आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी तपास करत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर एक पोस्ट करत शोक व्यक्त केला. तसेच या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.