सविंदणे (वार्ताहर)- उरण- पनवेल – नेरळ – भोरगीरी – वाडा – खेड – शिरुर – पाबळ रस्ता राज्य मार्ग १०३ हा पाबळ फाटा शिरूर हद्दीपर्यंत सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूर यांच्या अखत्यारीत असून संबंधीत रस्ता हा “उरण-पनवेल-नेरळ-भोरगीरी-वाडा-खेड-शिरुर-पाबळ रामलिंग-आण्णापूर- निमगाव भोगी – आमदाबाद – टाकळीहाजी- जांबूत- मलठण – कान्हूर मेसाई – कवठे-सविंदणे, अशा विविध ठिकाणी जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे.
या गावांकडे जाण्यासाठी “पाबळफाटा” येथे बस थांबा नसल्यामुळे नागरिकांची प्रंचड गैरसोय होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता जाधव यांना निवेदन दिले होते.
निवेदनामध्ये वाळूंज यांनी सांगितले आहे की, पाबळफाटा येथून अनेक वयोवृद्ध, तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक हे एस. टी, बस तसेच प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या विविध वाहनांच्या प्रतीक्षेसाठी उभे असतात. ऊन, वारा, पाऊस असतानाही गाडी मिळेपर्यंत तेथे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. याठिकाणी बस थांबा नसल्याने व नागरिकांची बसण्यासाठी योग्य सोय नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.
पाबळ फाटा चौक हा शहरातील एक मुख्य चौक असून विविध गावांना जोडणारा असल्याने या बाबींचा गांभीयपुर्वक विचार करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. याठिकाणी लवकरात लवकर बसथांबा उभारण्यात यावा, अशी वाळुंज यांनी निवेदनातून प्रमुख मागणी केली आहे.
मौजे आण्णापुर गावामध्येही शिरूर बाजूकडे येण्याच्या मार्गावर सर्वेक्षण करुन बसथांबा उभारण्याबाबत ही मागणी वाळुंज यांनी केलेली आहे निवेदनाची दखल घेत लवकर संबंधित ठिकाणी बसथांबा उभारण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक अभियंता श्रेणी १ जाधव यांच्याकडून देण्यात आल्याचे वाळुंज यांच्याकडून सांगण्यात आले.