पुन्हा पुन्हा रामायण

रामायण होऊन अनेक युगे लोटली तरी ही आज त्याचे स्मरण आपण ठेवतो हे आपल्याला मिळालेले एक उल्लेखनीय वरदानच आहे. मनुष्य अनुकरणीय ह्याच उक्तीला पुढे नेऊन म्हणूया, “पुढच्यास ठेच मागच्यास शहाणा’ मग रामायणाचा जीवनपट आपल्या समोर उलगडतो त्यातील मानवी संबंधांचा दुवा नकळत आपण आपल्यात रुजवण्याचा प्रयत्न करत युगानुयुगे रामायणच घडवण्यात मग्न असतो. रामायण एकदाच नव्हे, तर सतत घडतच राहते, राहील. फक्त संदर्भ बदलतील.

रामनवमीच्या निमित्ताने दर वर्षी आपण रामायणाचा पट उलगडण्यात जातो अन चालू जीवनाशी त्याचा अर्थ मिळवत राहतो. संस्कृती संस्करांचे पुरच्चशरणच म्हणूया. भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ मानून आपल्या कर्तव्याची परिसीमा दाखवणारे ” प्रभू श्रीराम’ तर पती आज्ञा शिरसावंद्य मानून पतीच्या सोबत राहणारी सहचारिणी ” सीता’. दोघांचे एकमेकांवरचे नाते, विश्‍वास वृद्धिंगत करत रामायण घडते. पण निमित्त एक अविचारी विचारच कैकेयीमार्फत पसरतो अन रामाला लक्ष्मण-सीतेसह वनवास घडतो. भोग्यविलासात ढकलतो अन रामायण घडते. कलियुगातही अशीच अनेक रामायणे घडत असतील, असतात. रामायण युगानुयुगे अखंड घडत जाते अन जगण्याचा ध्यास, ध्येय बनून जाते.

रामायणातील “स्त्री’ पात्रांचा उल्लेख करताना ज्या मातेच्या उदरातून प्रभू श्रीरामांचा जन्म झाला ती कौसल्या माता, पत्नीधर्माचे पालन करताना ‘पुत्रवियोग’ही सहन करते. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या मातांचा उल्लेख येता. मंथरा, शूर्पणखा, कैकयी यांसारख्या अपप्रवृत्तींनाही रामाला सामोरे जावेच लागते, तर शबरी सारखी गोड रसाळ भवननिष्ठेचे प्रतीक बनते, अहिल्येचा उद्धार होऊन त्यागातून तेजाची निर्मिती होते. या सगळ्या स्त्री प्रतिकांवर रामायण तर सीता पतीसोबत वनवासाला जाणारी पतिव्रता तिचे योगदान विसरता न येणारेच; पण कायम दुर्लक्षित राहिलेली “ऊर्मिला’ जास्त भावली. पतीची आज्ञा शिरसंवाद मानून पतीच्या मागे त्याच्या आईवडिलांची सेवा करण्यास थांबलेली त्यागाची खरी मूर्ती वाटते.

दांम्पत्यजीवनाची नवीन स्वप्ने मनात असताना केवळ पतीची इच्छा म्हणून ती त्या स्वप्नांना कुरवाळत न बसता मुक्त करते अन 14 वर्षे अखंड निद्रादेवीच्या अधीन राहून आपल्या पतीला दिलेले वचन पूर्ण करते, तिचा हा त्याग जास्त मोलाचा, या अबोल त्यागाला वंदन करावेसे वाटते. रामायण वेगवेगळे पैलू आयुष्य जगण्यासाठी ठेवून जाते. रामाच्या वाट्याला आलेला वनवास, सीतेचा त्याच्या सोबत जाण्याचा निर्णय, सर्वर्‌ कलांनी युक्त असा रावण, लक्ष्मण या सगळ्यातून केवळ एकच गोष्ट लक्षात येते. प्रत्येक जण आपापला निर्णय घेऊन भोगास पात्र ठरला. त्यास नशीब म्हणता येईल का? असाही प्रश्‍न पडतो. थोड्याफार फरकाने आजच्या या कलियुगात हे रामायण प्रतिकस्वरूप चालू आहे असे वाटते. त्यातल्या काही गोष्टी आपण आपल्या आचरणात आणल्या, तर त्यातील वेगळ्या पैलूंचा विचार आपल्याला समृद्ध करील. “रामनवमी’ एक सहृदय संवेदना. मनापासून जपलेली एक परंपरा. राम सीतेचा आदर्श आजही आपण मानतो. हीच धगधग म्हणून आपण आपल्या संस्कृतीशी अजून जोडून आहोत याची साक्षच म्हणावी लागेल. राम-सीतेचा हा त्याग भावनेपेक्षा कर्तव्यची जाणीव करून देतो. पुन्हा पुन्हा रामायण घडतच राहणार याची प्रचिती देऊन जातो…!

– मधुरा धायगुडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.