सचिननेही दिला भूतकाळातील घटनांना उजाळा
मुंबई –मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यामुळेच मला भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली, अशा शब्दात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सचिनचे आभार मानले आहेत. त्याचवेळी धोनीनेच आता नेतृत्वाची जबाबदारी सांभाळावी व तोच कर्णधारपदासाठी योग्य आहे, अशी विनंती मी तत्कालीन बीसीसीआय सदस्यांना केली होती, अशा शब्दात सचिननेही भूतकाळातील घटनांना पुन्हा एकदा उजाळा दिला.
2007 साली कर्णधारपद कोणाकडे सोपवावे याची चर्चा बीसीसीआयच्या सदस्यांमध्ये सुरू होती. त्यावेळी मलाच ही जबाबदारी स्वीकारण्याची विनंतीही केली गेली होती. मात्र, मला त्यात रस नव्हता. मात्र, धोनीकडे नेतृत्वगुण आहेत हे मला लक्षात आले होते. त्यामुळेच मी त्याचे नाव सुचवले, अशी आठवणही सचिनने सांगितली.
2007 साली मला दुखापत झाल्यामुळे मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे माझ्याकडे नेतृत्व देण्यापेक्षा धोनीचा विचार करा असे मी सांगितले होते. माझे मत बीसीसीआयला पटले व त्यांनी धोनीकडे संघाची धुरा सोपवली. मी अनेकदा स्लीपमध्ये धोनीच्या शेजारीच क्षेत्ररक्षण करायचो, असेही सचिन म्हणाला.
सर्वात यशस्वी कर्णधार…
कर्णधारपदाच्या काळात धोनीने भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त यश मिळवून दिले आहे. आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकून दोणारा तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नावाजला जातो. 2007 सालची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा, 2013 सालची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा व 2011 सालची एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा अशा स्पर्धा भारतीय संघाने धोनीच्याच नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत.