सतर्क पुणेकरांना ‘आभार कुपन’

पुणे -वाहतूक पोलिसांच्या “सतर्क पुणेकर’ या “ऍप’वर तक्रार नोंदविणाऱ्या “पुणेकरांना’ आता “आभार कुपन’ देण्यात येत आहे.

“सतर्क पुणेकर’ या वाहतूक पोलिसांच्या “ऍप’वर नियमांचे पालन न करणारा वाहनचालक दिसल्यास नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकतात. यानुसार संबंधित वाहनचालकावर कारवाई करण्यात येते. नो-पार्किंगमध्ये गाडी लावणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे, नो-एन्ट्रीतून वाहन चालविणे, सिग्नल तोडणे आदीबाबत फोटो काढून माहिती देणाऱ्या निवडक 50 “सतर्क’ पुणेकरांना हे कुपन देण्यात येणार आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी वाहतूक शाखेचे “आभार’ योजना सुरू केली.

वाहतूक पोलिसांनी वाहन थांबविले आणि वाहनावर कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यास वाहनचालकाला वाहतूक पोलिसांकडून “आभार’ कुपन देण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून ही योजना वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात येत आहे. वाहनचालकाला मिळालेल्या कूपनवर असणाऱ्या क्रमांकानुसार हॉटेल्स आणि विविध दुकानांमध्ये सवलत दिली जाते. शहरातील सुमारे 200 अधिक व्यावसायिकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 20 हजारपेक्षा अधिक वाहनचालकांना कूपन देण्यात आले आहेत.

“सतर्क पुणेकर’ ऍपच्या माध्यमातून अनेक तक्रारी दाखल होतात. त्यापैकी ज्या तक्रारी “मान्य’ करून, कारवाई झाली जाते. अशा तक्रारी पाठविणाऱ्या 50 जणांना हे “कूपन’ देण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त पंकज देशमुख म्हणाले.

“सतर्क पुणेकर’ ऍप
प्ले स्टोअरवरून नागरिकांना “सतर्क पुणेकर’ ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. “रजिस्ट्रेशन’ झाल्यानंतर नियम तोडणाऱ्या वाहनाचे छायाचित्र आणि कारण “अपलोड’ करावे लागेल. मात्र ही तक्रार “अपलोड’ करताना त्याच्यावर “लोकेशन’ आणि “वेळ’ असणे आवश्‍यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.