ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यात जानेवारीपासून ते 13 ऑक्टोबरपर्यंत अंमली पदार्थांशी संबंधित 660 हून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी 771 जणांना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत ड्रग्ज तस्करांकडून 3.68 कोटींचे ड्रग्ज आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे ठाणे (Thane) हे ड्रग्ज तस्करांचा अड्डा असल्याचे दिसून येत आहे.
ही आकडेवारी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समन्वय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात 1 जानेवारी ते 13 ऑक्टोबर दरम्यान ड्रग्जशी संबंधित एकूण 663 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. या गुन्ह्यांमध्ये 771 जणांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यांमध्ये 3,68,86,698 रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलचे (एएनसी) वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे यांनी दिली.
या कालावधीत गांजाशी संबंधित एकूण 39 गुन्हे दाखल करण्यात आले असून 53 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 1 कोटी 16 लाख 46,518 रुपये किमतीचा तब्बल 739 किलोग्राम गांजा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 64,92,870 रुपये किमतीचे आणि 1.585 किलोग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी अठ्ठेचाळीस जणांना अटक करण्यात आली असून 29 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंमली पदार्थ – गुन्हे – अटक – मुद्देमाल
गांजा – 39 – 53 – 1,16,46,518
मेफेड्रोन – 29 – 48 – 64,92,870
चरस – 6 – 12 – 72,74,000