मुंबई – साऊथचा सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत सध्या त्याच्या मोस्ट अवेटेड ‘जेलर’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज करताच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुन्हा एकदा 72 वर्षीय रजनीकांत अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी आणखी उत्सुक व्हाल. ट्रेलरमध्ये रजनीकांतच्या अॅक्शनसोबतच त्याचे डायलॉग दमदार आहेत. रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट 250 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहे.
हा चित्रपट येत्या 10 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार असून, अभिनेते रजनीकांत जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे चेन्नई आणि बंगलोरमधील अनेक कंपन्यांनी 10 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.
मात्र ‘जेलर’ची ॲडव्हान्स बुकिंग शनिवारी, 5 ऑगस्टपासून सुरू झाली. रजनीकांत यांच्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे, की उशिरा बुकिंग सुरू होऊनही या चित्रपटाने ‘गदर 2’ला मागे टाकलं आहे. सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाची आतापर्यंत 1 लाख 70 हजार तिकिटं विकली गेली आहेत.
तर ‘जेलर’ची ॲडव्हान्स बुकिंग 2 लाख 30 हजार इतकी झाली आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पहायला मिळतेय. चित्रपट व्यापार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जेलर’ने अमेरिकेत ॲडव्हान्स बुकिंगद्वारे आतापर्यंत जवळपास 53 लाख रुपये कमावले आहेत.