बॅंकॉक – भारताच्या साईना नेहवाल, किदम्बी श्रीकांत व पारुपल्ली कश्यप यांना थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतच हार मानावी लागली. मात्र, दुहेरीत सात्विकसाईराज रान्किरेड्डी व चिराग शेट्टी यांनी अपराजित्व राखले.
ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती खेळाडू साईनाला जपानच्या सायका ताकाहाशीने 16-21, 21-11, 21-14 असे पराभूत केले. पुरुषांच्या एकेरीत श्रीकांतला स्थानिक खेळाडू खोसित फेतप्रदोबने 11-21, 21-16, 21-12 असे हरविले.
चीन तैपेईच्या चोऊ तिएन चेनने ऑलिंपिकपटू कश्यपचा 21-19, 21-14 असा पराभव केला. बी.साईप्रणीतने शुभंकर डे याचा 21-19, 21-19 असा पराभव केला. दुहेरीत रान्किरेड्डी व शेट्टी यांनी फजीर आल्फियन व मोहम्मद रियान आर्दियांतो यांच्यावर 21-17, 21-19 असा निसटता विजय मिळविला. त्यांनी या सामन्यात स्मॅशिंगचे जोरकस फटके व अचूक सर्व्हिस असा खेळ केला. मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव जेरी चोप्रा व एन.सिक्की रेड्डी यांना तांग चुनमन व त्सेई यिंग सुएत यांच्याकडून 16-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला.
साईनाने ताकाहाशीविरुद्ध पहिल्या गेममध्ये स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच तिने सर्व्हिसवरही नियंत्रण ठेवले होते. ही गेम घेत तिने अपेक्षा उंचावल्या. तथापि ताकाहाशीने दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस व ड्रॉपशॉट्सवर नियंत्रण मिळविले. ही गेम घेत तिने सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या गेममध्ये साईनाने सुरुवातीला चांगला खेळ केला. परंतु तिच्याकडून झालेल्या चुकांचा फायदा ताकाहाशीने घेतला नाही तर नवलच. ताकाहाशीने चतुरस्त्र खेळ करीत ही गेम घेतली आणि विजयश्री खेचून आणली.
श्रीकांतने फेतप्रदोबविरुद्ध पहिली गेम घेत झकास प्रारंभ केला होता. त्याने या गेममध्ये कॉर्नरजवळ प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला. ही गेम जिंकून त्याने आशा पल्लवित केल्या. तथापि दुसऱ्या गेममध्ये फेतप्रदोबला सूर सापडला. त्याने ड्रॉपशॉट्सचा वेगवान खेळ केला व श्रीकांतचा बचाव निष्प्रभ ठरविला. ही गेम गमाविल्यानंतरही श्रीकांतने चिवट झुंज दिली. फेतप्रदोबने पुन्हा आक्रमक खेळ केला व सामना जिंकला.