Dasara Melava – मुंबई महापालिकेने गुरुवारी अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्याची औपचारिक परवानगी दिली. मुंबई मनपाच्या जी उत्तर विभागाने ही परवानगी दिली. यामुळे शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याच्या मुद्यावरून शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात मोठी रस्सीखेच रंगली होती. गत 1 ऑगस्ट रोजी ठाकरे गटाने, तर 7 ऑगस्ट रोजी शिंदे गटाने महापालिकेकडे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी देण्यासंबंधीचे अर्ज दाखल केले होते.
पण त्यानंतर शिंदे गटाने नुकतेच आपले पत्र मागे घेतले होते. त्यामुळे ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला. बीएमसीने गुरुवारी ठाकरे गटाला या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. त्यानुसार, येत्या 24 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडेल.