मुंबई – देशातील सर्व विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रॅंड हयात या हॉटेलमध्ये पार पडली. बैठकीच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात होण्याआधी सर्व नेत्यांनी एकत्रीत फोटोसेशन केले. या फोटोसेशनच्या वेळी पहिल्या रांगेत उभे असलेले उद्धव ठाकरे यांनी हाताची घडी घातली होती.
ते अतिशय आरामात उभे दिसत असताना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र, अत्यंत दाटीवाटीत उभे असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही पहिल्या रांगेत स्थान मिळालेले दिसून आले.
फोटोसेशनमध्ये पहिल्या रांगेत उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच खासदार संजय राऊत, मेहबुबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, लालुप्रसाद यादव, एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारूक अब्दुल्ला या नेत्यांचा सामावेश होता.
तर, आमदार आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंच्या अगदी मागे दुसऱ्या रांगेमध्ये उभे होते. त्यांच्या बाजूलाच खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित आहेत. त्याचबरोबर काही नेते दुसऱ्या आणि काही नेते तिसऱ्या रांगेत उभे असल्याचेही दिसले.