पुणे – टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरझडतीतून जप्त करण्यात आलेले 65 लाख 13 हजार 800 रुपयांचे सोन्याचे दागिने परत देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी दिला आहे.
पंचनाम्याने जप्त करण्यात आलेले दागिने परत मिळावेत, असा अर्ज फौजदारी दंडसंहिता कलम 451 अन्वये अॅड. मिलिंद पवार आणि अॅड. अक्षय शिंदे यांनी केला होता. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.
सायबर पोलिसांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम नामदेव सुपे यांना 17 डिसेंबर 2021 रोजी अटक केली. परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कालावधीत सुपे यांच्या घरातून जावई, मुलगा, नातेवाईकांकडून 2 कोटी 34 रुपये रोख आणि 65 लाख 13 हजार 800 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मिळकतीची इतर कागदपत्रे जप्त केली होती.
Mumbai : केजरीवाल, भगवंत मान घेणार ‘उद्धव ठाकरें’ची भेट;जाणून घ्या…. काय आहे कारण
या प्रकरणी मुख्य आरोपी तुकाराम सुपे, सुखदेव ढेरे यांसह 15 जणांविरोधात 3 हजार 995 पानांचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेले आहे. त्यानंतर अर्ज करून अॅड. मिलिंद पवार आणि अक्षय शिंदे यांनी दागिने परत मागितले. त्यामध्ये दागिने पोलीस ठाण्यात पडून राहिले तर सुपे कुटुंबीयांचे नुकसान होईल. खटल्याचा निकाल लागेपर्यंत हे दागिने आहे त्या परिस्थितीत ठेवू व तसे बंधपत्र न्यायालयात देऊ, असा युक्तीवाद करण्यात आला.