पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहारात अटकेत असलेले आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे करोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. सुपे यांना उपचारांसाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात यावे असा अर्ज सुपे यांच्या वकिलांकडून शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात आला.
सुपे करोनाबाधित असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले असून त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात यावे. उपचाराचा खर्च सुपे करण्यास तयार आहेत, असा अर्ज सुपे यांचे वकील ऍड. मिलींद पवार, ऍड. योगेश पवार, ऍड. विश्वास खराबे यांनी न्यायालयात सादर केला.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी अर्ज दाखल करून घेतला आहे. या अर्जावर सरकार पक्ष तसेच तपासी अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे मांडावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या अर्जावर सोमवारी (10 जानेवारी) सुनावणी होणार आहे.