येत्या ऑक्‍टोबरमध्ये “टीईटी’

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता ऑक्‍टोबरमध्ये ही परीक्षा होणार आहे.

राज्यात सहावेळा “टीईटी’ घेण्यात आल्या असून त्यात 86 हजार 298 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. 19 जानेवारी 2020 नंतर एकही परीक्षा घेण्यात आली नाही. राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये परीक्षा घेण्याची परवानगी मागितली होती. शासनाने एप्रिलमध्ये मान्यतेचे पत्र पाठविले. तसेच. मे महिन्यात परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, करोनामुळे या परीक्षा घेणे शक्‍य झाले नव्हते. त्यामुळे परीक्षा परिषदेने पुन्हा 9 जुलै रोजी परीक्षा घेण्याबाबत परवानगीचे पत्र शासनाला पाठविले होते. त्यावर शासनाने नुकताच निर्णय कळविला आहे.

राज्यात 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान “टीईटी’ घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रविण मुंढे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्‍त तथा अध्यक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे आता परीक्षा परिषदेकडून परीक्षेबाबतच्या अधिसूचना पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.