नवी दिल्ली – करोनाच्या साथीमुळे जागतिक दहशतवादी संघटना जैविक दहशतवादाकडे वळत आहेत. यासाठी इसीस या दहशतवादी संघटनेने डॉक्टररेट शिकलेल्यांची भरती करून त्यांना जैविक आणि रासायनिक शोधनिबंध प्रसिध्द झालेली नियतकालिके अभ्यासासाठी देण्यात येत असल्याचे ग्लोबल सेक्युरिटी या प्रख्यात नियतकालिकांत प्रसिध्द झालेल्या शोध निबंधात म्हटले आहे.
ही साथ सुरू झाल्यानंतर शास्त्र, आरोग्य आणि धोरणात्मकदृष्ट्या दहशतवादी कारवायांचा अभ्यास ग्लोबल सेक्युरिटी या नियतकालिकांत प्रकाशित झाला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. सगळ्यात भयावह म्हणजे करोना साथीचा झालेला जगावर झालेला परिणामाकडून जिहादी भरपूर शिकलेले आहेत.
त्यामुळे किचकट डिव्हाईस, बॉम्ब आणि आत्मघाती हल्ल्यापेक्षा ते जैविक युध्द आणि जैविक दहशतवादाकडे वेगाने वळत आहेत. डॉक्टररेट पातळीवरच्या शास्त्रज्ञांना इसिसने भरती केले आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जैविक आणि रासायनिक प्रगतीचे नियतकालिकांचा अभ्यास करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
जिहादी आणि हक्कांसाठी लढणाऱ्या अशा दोन्ही गटांना या साथीने ते द्वेष करतात अशांचा नायनाट करण्यासाठी हिंसाचाराचे साधन पुरवले आहे, असे या शोधनिबंधाचे लेखक ऍरी कृग्लान्स्की यांनी म्हटले आहे. ते अमेरिकेच्या मेरीलॅंड विद्यापीठात अध्यापन करतात. सगळ्यांचे लक्ष या साथीतून कसे बाहेर पडावे याकडे आहे. मात्र त्यावेळी आपण दहशतवाद्यांच्या हातात हे अस्त्र सापडले तर काय घडेल याचाही विचार करायला हवा, असे ते म्हणाले.
सामान्य माणसे जगण्याची लढाई लढत असताना या दहशतवादी संघटनांनी साथीच्या या काळात आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. इसिसने एकट्या मार्च महिन्यात सात मोठे हल्ले केले. इस्लामिक स्टेटस् खोरसान प्रोव्हिअन्सने अफगाणीस्तानात दफनविधीवेळी मोठा नरसंहार केला.
अल कायदाच्या अल शबाब या संघटनेने सोमालिया आणि केनियात 37 हल्ले या काळात केले.
या साथीच्या काळात या दहशतवादी संघटनांनी त्यांच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी आणि नवी भरती करून घेण्यासाठी मोठी मजल मारली. त्यांच्या प्रचारकांनी यात मोठी कामगिरी नोंदवल्याचे कृग्लान्स्की यांनी म्हटले आहे.
अपप्रचाराचे शिखर
करोनाची साथ पसरवल्याबद्दल अमेरिका आणि चीनला दुषणे देण्याऐवजी इस्लामिक स्टेट्स आणि अल कायदाचे प्रचारक अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी जे दु:ख दिले, त्याचा बदला घेण्यासाठी अल्लाहने पाठवलेला दूत असल्याचा दावा करत आहेत.
प्लेगसारखाच करोना हा अल्लाहच्या दुष्मनांना मारण्यसाठी पाठवण्यात आला आहे. मे महिन्यात इसिसचा प्रवक्ता अबु हमझा अल कुरेशी यांनी एक भाषण केले. त्यात त्याने मोझेसचा संदर्भ देत हे भाष्य केले होते.