कोथरूड – “कोथरूडकर झालो’ असे म्हणून काही होत नाही.’ या पुढे कोथरूडचा आमदार हा शिवसेनेचाच, तोही येथील “स्थानिक’ असेल, असा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. शिवाय स्थानिक नेत्यांना एकप्रकारे पाठबळ दिले.
एका कार्यक्रमानिमित्त संजय राऊत आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. “कोथरूड हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, मागील दहा वर्षांत तो डगमगला असून, गटबाजीचा फटका पक्षाला बसतोय का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पिढीतील शशिकांत सुतार यांच्यासह अन्य जाणकार शिवसैनिकांनी कोणतीही सत्ता नसताना पक्षवाढीसाठी नेहमी प्रयत्न केला.
आता नवीन पिढी पक्षवाढीसाठी काम करत आहे. “गटबाजी’ ही सगळ्याच पक्षांमध्ये दिसते. जो सत्तेत येतो, किंवा सत्तेजवळ जातो त्यावेळी वाद, गटबाजी होणार. तो वाद मिटवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.’
“कोणी म्हटले म्हणून कोथरूडकर होत नाही,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावत राऊत यांनी आपल्या शैलीत “कोथरूडचा पुढचा आमदार शिवसेनेचा असेल, तोदेखील स्थानिक असेल, असे सांगितले. एकंदरीतच बाहेरून आलेल्यांना कोथरूडमध्ये पुन्हा संधी नाही. त्यासाठी पक्षांतर्गत गटबाजी बाजूला ठेवून एकजुटीने काम करा,’ असा सूचक सल्लाच राऊतांनी यावेळी दिला.