नवी दिल्ली – बलुचिस्तानमधील माच तुरुंगावर आज दहशतवाद्यांनी सशस्त्र हल्ला केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी हा हल्ला परतवून लावला. या तुरुंगावर एकूण ३ हल्ले करण्यात आले होते. बलुचिस्तानमधील रहिवासी भागातील या तुरुंगावर दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री रॉकेट आणि अत्याधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने हे हल्ले केले होते. किमान १५ रॉकेट डागली गेली होती, असे अधिकार् यांनी सांगितले.
पाकिस्तानचे लष्कर आणि फ्रॉन्टियर कॉन्स्टाब्युलेटरी बलुचिस्तानच्या सुरक्षा रक्षकांनी त्वरित या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये दीर्घकाळ चकमक सुरू होती. या चकमकीमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे ५ दहशतवादी मारले गेले. तर दोन पोलीस कर्मचारी देखील मारले गेल्याचे वृत्त समजते आहे. गोळी लागून एक ट्रक चालक देखील जखमी झाला असल्याचे वृत्त समजते आहे. मात्र त्याचे अधिकृत समर्थन केले जाऊ शकलेले नाही.
तुरुंगावर डागण्यात आलेली रॉकेट जवळच्या टेकड्यांवरून सोडण्यात आली होती. माच गावातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही रॉकेट पडली आणि त्यांचे स्फोट झाले. रॉकेट डागल्यानंतर दहशतवाद्यांनी माच तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकांच्या चौकीवरही हल्ले केले. माच रेल्वे स्टेशनमध्येही दहशतवादी घुसले होते.
गोळीबाराचे आजाव ऐकू येऊ लागल्यावर लाऊड स्पीकरवरून नागरिकांना घरातच बसून राहण्याची सूचना दिली गेली. सुमारे दोन तास धुमश्चक्री चालल्यानंतर पहाटेपूर्वी दहशतवादी जवळच्या टेकड्यांमध्ये पळून गेले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये तुरुंगाचे काहीही नुकसान झाले नसल्याचे नंतर जाहीर करण्यात आले.
अनेक दहशतवादी असलेला तुरुंग
तुरुंगामध्ये अनेक कुख्यात दहशतवादी आणि फाशीची शिक्षा झालेल्या एकूण ८०० कैद्यांना देखील ठेवण्यात आले आहे. या कैद्यांमध्ये अस्लम अचो ग्रुपशी संबंधित मजिद ब्रिगेडचे दहशतवादी देखील आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या महिन्यात पाकिस्तानने इराणमधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्त्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला असल्याचा अंदाज सुरक्षा अधिकार् यांनी व्यक्त केला आहे.