बारामती – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास २०२३-२४ या वित्तीय वर्षात राज्य योजनांतर्गत मंजूर अनुदानातून ३ टेस्ला एम.आर.आय. ऑन टर्न की बेसीस यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून याची किंमत २५ कोटी दहा १० रुपये इतकी आहे. त्यामुळे मेंदू सारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या अतिसूक्ष्म नसांचे देखील अचूक निदान या मशीनद्वारे होणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
एमआरआयमुळे रोगाचे अचूक निदान केले जाते. मात्र ही तपासणी महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला परवडणारे नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात ही यंत्रणा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारची तपासणी करण्यासाठी सर्वसामान्य रुग्णांना खर्चिक व महागड्या रुग्णालयात जावे लागणार नाही. ३ टेस्ला एम आर आय हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.
तालुका पातळीवरील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात याचा समावेश होत असल्याने रुग्णांच्या दृष्टिकोनातून ही बाब खूप महत्त्वपूर्ण आहे. या यंत्रसामुग्रीची मागणी वेळोवेळी केली जात होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून ही बाब शक्य झाली आहे. अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील, अधिष्ठता डॉ. चंद्रकांत मस्के, डॉ. राजेश उमाप, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले.