fbpx

जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

“वंचित’च्या हाकेला लोणंदमध्ये प्रतिसाद

लोणंद – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला लोणंदकरांनी शंभर टक्‍के प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.


एनआरसी व सीएए कायद्याविरोधात ऍड. आंबेडकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत लोणंदकरांनी सर्व व्यवहार बंद ठेवले होते.वंचित बहुजन आघाडीच्या लोणंद शाखेच्यावतीने सकाळी 10 वाजता मोर्चा काढण्यात आला. बौद्ध विहारापासून मोर्चा सुरू झाला. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चा आंबेडकर चौक, शास्त्री चौक, शिवाजी चौक, जाधव आळी, बाजारतळ, गांधी चौक, तानाजी चौक, लक्ष्मी रोडमार्गे नगरपंचायत पटांगणात आला.

“एनआरसी कायदा रद्द करा’, “भाजप हटाव, संविधान बचाव’ अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. नगरसेविका शैलजा खरात, भारिपचे खंडाळा तालुकाध्यक्ष कांतिलाल खुंटे, इम्रान बागवान, नंदकुमार खरात यांची भाषणे झाली. मोर्चात नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे, “वंचित’चे प्रचारक दादासाहेब खुंटे, उमेश खरात, राजाभाऊ खरात, इक्‍बाल बागवान, सुनील अण्णासाहेब खरात, सुनील खरात व कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन करण्यात आले. लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनी संतोष चौधरी व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बंदचा “लोणंद पॅटर्न’
व्यापारी व सर्वसामान्यांना बंदचा फटका बसू नये म्हणून लोणंदचे तत्कालीन सपोनि गिरीश दिघावकर यांनी गेल्या वर्षी व्यापारी, विविध पक्षांचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन बंदचा अनोखा “लोणंद पॅटर्न’ अंमलात आणला होता. त्यानुसार आज सकाळी 11 वाजेपर्यंतच लोणंद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.