कुरकुंभ -पुणे जिल्ह्यातील केमिकल झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील कुसुम डिस्टीलेशन या कंपनीला आज सकाळी साडे दहाच्या सुमारास आग लागली. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने तेथील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
जवळपास तीन किमी पर्यंत आगीचे लोट हे स्पष्ट दिसत असल्याने काही वेळ नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती, अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली.
कुरकुंभ अग्निशमन दलाची एक गाडी, दौंड नगरपरिषद, जेजुरी नगर परिषद, इंदापूर नगरपरिषद, बारामती ऍग्रो, पुण्यातील अग्निशमनच्या अशा 8 ते 10 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. यावेळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील हे घटनास्थळी स्वतः हजर राहून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयन्त करीत होते. आग सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी नागरिकांना कंपनीच्या जवळ येण्यास मज्जाव केला होता.
बारामती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील या कंपनीला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. एकंदरित अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमानंतर ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली. मात्र ही आग कोणत्या कारणाने लागली हे स्पष्ट झाले नाही, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये स्फोट होतात. या अगोदर देखील स्फोट झालेल्या कंपन्यांवर बोगस कारवाई केली आहे. अशा कंपन्यावर कठोरातील कठोर कडक कारवाई करावी, यासाठी कुरकुंभ उपअभियंता यांना ग्रामपंचायतच्या वतीने लेखी पत्रव्यवहार केला आहे.
-राहुल भोसले, सरपंच कुरकुंभ