लॉकडाऊनमुळे देशात वाचले 78 हजार जणांचे प्राण

निर्बंध नसते तर करोनाबाधित असते 29 लाखांच्या घरात

नवी दिल्ली: करोना फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन देशासाठी अतिशय लाभदायी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. लॉकडाऊनमुळे देशात 37 हजार ते 78 हजार जणांचे प्राण वाचले. लॉकडाऊन नसता तर देशात 14 लाख ते 29 लाख इतक्‍या संख्येने करोनाबाधित असते, असा दावा शुक्रवारी केंद्र सरकारने विविध अभ्यास अहवालांचा आधार घेत केला.

सर्वप्रथम 25 मार्चला देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याची मुदत खंड पडू न देता वाढवण्यात आली. सध्या देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. देशात करोना फैलाव रोखण्यात कितपत यश आले, लॉकडाऊनचा नेमका फायदा काय झाला यांसारखे प्रश्‍न प्रसार माध्यमांकडून आणि विविध घटकांकडून उपस्थित केले जात आहेत.

त्यापार्श्‍वभूमीवर, केंद्र सरकारने अभ्यास अहवालांचा दाखला देत करोना फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन अतिशय मोलाचा ठरल्याचे सूचित केले आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या मॉडेलनुसार तर देशात 1.20 लाख ते 2.10 लाख दरम्यान जीवितहानी टळली. लॉकडाऊनमुळे देशात 36 लाख ते 70 लाख नागरिकांना करोना संसर्ग होण्याचा धोका टळल्याचा निष्कर्ष त्या ग्रुपने काढल्याचेही सरकारकडून नमूद करण्यात आले.

दरम्यान, देशातील करोना मृत्यूदर 19 मे यादिवशी 3.13 टक्के इतका होता. आता तो 3.02 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. देशात 24 तासांत तब्बल 3 हजार 234 बाधित करोनामुक्त झाले. आतापर्यंत पूर्ण बरे झालेल्या देशातील रूग्णांची संख्या 50 हजारांचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे आहेत. बाधित करोनामुक्त होण्याचे देशातील प्रमाण सुमारे 41 टक्के आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×