नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपास विलंब होत असल्याबद्दल आपने मंगळवारी नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर, गोवा आणि गुजरातमधील ३ उमेदवारही जाहीर केले. त्या घोषणेवर कॉंग्रेसने आक्षेप घेतला. त्यामुळे इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीचे घटक असणाऱ्या आप आणि कॉंग्रेसमध्ये जागावाटपावरून तणातणी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
आपच्या राजकीय व्यवहार समितीची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर आपचे नेते संदीप पाठक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी गुजरातमधील भरूच आणि भावनगर, तसेच दक्षिण गोवा या मतदारसंघांमधील उमेदवारांची नावे जाहीर केली.
दिल्लीतील लोकसभेच्या ७ पैकी ६ जागा लढवण्यास आप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. जागावाटपासंदर्भात आप आणि कॉंग्रेसमध्ये ८ आणि १२ जानेवारीला बैठका झाल्या. त्या दोन्ही बैठका अनिर्णित राहिल्या. त्यानंतर महिनाभर कुठलीही बैठक झाली नाही. त्यामुळे आपवर पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली, असे त्यांनी म्हटले.
आपने परस्पर उमेदवार जाहीर करण्याची कृती कॉंग्रेसची कोंडी करणारी आहे. त्याशिवाय, कॉंग्रेसने मागील निवडणुकीत (वर्ष २०१९) जिंकलेल्या दक्षिण गोवा या लोकसभा मतदारसंघात आपने उमेदवार जाहीर केला आहे. आपने दिल्लीत कॉंग्रेसला अवघी १ जागा देऊ केली आहे.
कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या पातळीवरून अद्याप आपच्या घोषणेवर कुठली प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंदरसिंग लवली यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी ठरली आहे. पत्रकार परिषदांमध्ये जागावाटप होत नाही.
इतर कुठल्याही पक्षापेक्षा कॉंग्रेसने निवडणुकीला सामोरे जाण्याची अधिक जय्यत तयारी केली आहे,असे त्यांनी म्हटले. आपने याआधी पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली. तसेच, आसाममधील ३ उमेदवारही जाहीर केले. त्यामुळे आप आणि कॉंग्रेसमधील जागावाटप सुरळित होण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.