पुणे – फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मुख्य प्रवेशद्वारावर यंदा “प्रभात ते एफटीआयआय’ ही प्रतिकृती साकारली आहे. हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून साकारलेली या प्रतिकृतीचे शनिवारी (14 मार्च) रोजी संस्थेच्या माजी विद्यार्थी आणि प्रभात फिल्म कंपनीमधील प्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
एफटीआयआयच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आर्ट डायरेक्शन ऍन्ड प्रॉडक्शन डिझाइन विभागाच्या प्रा. आशुतोष कविश्वर यांच्या संकल्पनेतून कॅमेराची प्रतिकृती साकारली आहे. या प्रतिकृतीमध्ये मिशेल (20वे शतक) ते एआरआय अलेक्सा (21वे शतक) हे प्रभात आणि एफटीआयआयचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॅमेरासह सध्याच्या भारतीय चित्रपटसृष्टीत तंत्रांचादेखील समावेश यामध्ये केला आहे.
मिशेलच्या कॅमेऱ्यात प्रवेश करण्यापासून ही भेट त्याच्या लेन्स आणि लेन्सहूडच्या माध्यमातून सुरू होते आणि कॅमेरा बॉडीमध्ये प्रवेश करते. यामध्ये प्रभातचा काळ दाखविला आहे. तर प्रदर्शनाच्या आकर्षणासाठी महाराष्ट्रातील अद्वितीय वाड्याचे इंटिरिअर कॅमेऱ्याच्या आतील भागात तयार केले आहे. प्रभात काळातील प्रदर्शन पाहून बाहेर आल्यावर एफटीआयआय काळाचा एक अरुंद रस्ता दाखविला जातो. यामध्ये संस्थेचे 1961 सालापासूनचे अनेक प्रतिकात्मक क्षण छायाचित्रणाच्या माध्यमातून प्रदर्शित केले जातात, असे एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅंथोला यांनी सांगितले.