पुणे -शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आधी रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांकडून त्रास दिला जात होता आता दिवसाही पुणेकरांना लक्ष केले जात आहे. शहरात जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 अखेरपर्यंत तब्बल 10 हजार 559 घटना नोंदविल्या गेल्या आहेत. 2020 वर्षाच्या तुलनेत ही संख्या तब्बल दोन हजारांनी जास्त आहे. 2020 मध्ये शहरात श्वानदंशाच्या 8 हजार 655 घटना घडल्या होत्या. दरम्यान, महापालिकेने 2017 मध्ये केलेल्या प्राणीगणनेनुसार, शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 2 लाखांवर पोहोचली असून या मोकाट कुत्र्यांची नसबंदी वेगाने न झाल्यास पुढील काही वर्षांत पुणेकरांना श्वानदंशाच्या संकटाचा मोठा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. तर, ही भटकी कुत्री पकडण्यासाठी महापालिकेकडे अवघ्या पाच गाड्या असून महापालिकेच्या हद्दीसह आता समाविष्ट 23 गावांचा भारही पालिकेवर आला आहे.
आता दिवसाही हल्ला
आतापर्यंत मोकाट कुत्र्यांकडून रात्रीच्या वेळी रस्त्यावर अथवा कचरा पेट्यांच्या जवळ आलेल्या नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडत असत मात्र आता दिवसाही ही कुत्री टोळक्याने फिरताना आढळत असून लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे. तर, थेट लोहगाव विमानतळाच्या आवारापासून ते प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या आवारात या कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, नागरिकांना आता दिवसाही कुत्र्यांच्या भीतीचा सामना करावा लागता आहे.
गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक घटना
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांतील श्वानदंशाच्या सर्वाधिक घटना 2021 मध्ये घडल्या आहेत. 2018 मध्ये ही संख्या 9 हजार 134 होती, तर 2019 मध्ये 9 हजार 530 तर, 2020 मध्ये जवळपास आठ महिने लॉकडाऊन असतानाही श्वानदंशाची संख्या जवळपास 8 हजार 655 होती. मात्र, त्यात वर्षभरात तब्बल 2 हजारांनी वाढ होऊन हा आकडा 10 हजार 51 वर पोहचला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये मोकाट कुत्र्यांची धास्ती निर्मान झाली असून महापालिकेने तातडीनं याला प्रतिबंध करण्याची मागणी केली जात आहे.