पुणे – कुत्र्याने चावा घेतल्यानंतर वेळेत लसीकरण होणे गरजेचे असते अन्यथा रेबीज संसर्ग होण्याचा धोका असतो. आजही रेबीजवर उपचार नसल्याने नागरिकांमध्ये जागृतीअभावी दरवर्षी रेबीजचे रुग्ण सापडतात आणि त्यांच्यासमोर मृत्युशिवाय पर्याय नसतो. पुणे शहरात सध्या एकही रेबीजचा रुग्ण नसला तरी ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यातून पुण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दरवर्षी 15 ते 20 इतकी आहे. यामध्ये 2021-14, 2022-21 आणि 2023 (ऑगस्ट) मध्ये 17 व्यक्तींना रेबीजची लागण झाली.
पुणे महापालिका हद्दीत मागील तीन वर्षांत 42 हजार नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला, त्यामध्ये 2022 मध्ये सर्वाधिक 16 हजार 569 जणांना चावा घेतला आहे. यावर्षी जून अखेरीस 13 हजार 211 जणांची नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधात्मक लस दिल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मोफत मिळते लस…
रेबीज प्रतिबंधात्मक लसीचे दोन प्रकार असून साधी जखम असल्यावर चावा घेतल्यास त्याच दिवशी पहिली लस घ्यावी. त्यानंतर तिसऱ्या, सातव्या, चौदाव्या आणि एकविसाव्या अशा पाच लस घेणे आवश्यक आहे. खोलवर जखम असेल तर ग्रेड ए, बी, किंवा सी यानुसार लस उपलब्ध असते. दरम्यान, ही लस महापालिका आणि शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
रेबीज बाधित रुग्णाची लक्षणे
- संबंधित व्यक्ती पाण्याला घाबरतो
- रुग्ण कुत्र्याप्रमाणे वागायला लागतो
- सतत लाळ गळणे, मलूल पडून राहणे, हालचालींवर ताबा नसणे
- ताप येत राहणे, डोकेदुखी, निद्रानाश, नाक, डोळे आणि कानांतून स्राव
- उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करण
श्वानदंश झाल्यास काय करावे ?
- चावलेल्या ठिकाणी दहा वेळा साबणाने धुऊन घ्या.
- दंश झालेल्या ठिकाणी टिंक्चर आयोडिन, अल्कोहोल, डेटॉल भरपूर प्रमाणात लावावे.
- हळद लावू नका किंवा कोणतेही घरगुती उपचार करू नयेत.
- कापूस, चिकटपट्टी तसेच बॅंडेज बांधू नये.
- विशेषत: ग्रामीण भागात नागरिकांनी शासकीय रुग्णालयातूनच लस घ्यावी.
देश 2030 पर्यंत रेबीजमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडून सूचना आल्या असून पुणे शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये विशेष आराखडा तयार करून मोहीम राबवली जात आहे. – डॉ. सारिका फुंडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे मनपा
मागील तीन वर्षातील माहिती
वर्ष रेबीजची लागण कुत्र्याचा चावा
2021 14 12,024
2022 21 16,569
2023 (ऑगस्ट) 17 14,072